दौंड – महान्यूज लाईव्ह
यवत पोलिस ठाण्याच्या एका गुन्ह्यात तपास व्यवस्थित झाला नाही, कर्तव्यात पोलिसांनी कसूर केली, या कारणावरून तक्रारदाराने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि दौंडच्या प्रथमवर्ग न्यायालयाने चक्क तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, फौजदार पद्मराज गंपले, कैलास तावरे या चौघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

यासंदर्भात आरती शरद लव्हटे (घरकुल सोसायटी, पाथरेवस्ती, लोहगाव पुणे) व किरण शांताराम भोसले ( जोगवडी, पोस्ट मावडी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी न्यायालयात धाव घेतली होती. जमीनीच्या एका प्रकरणात पोपट उर्फ कैलास तावरे याच्याविरोधात यवत पोलिस ठाण्यात आरती लव्हटे व किरण भोसले यांनी सन २०२१ मध्ये तक्रार दिली होती. यामध्ये यवत पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता.
खरेदीखतातील फसवणूकीवरून तावरे याच्यासह केरबा लव्हटे, रामदास लव्हटे, लक्ष्मण लव्हटे व जनाबाई लव्हटे याच्याविरोधात आरती लव्हटे व किरण भोसले यांनी यवत पोलिसांकडे फिर्यादी दिल्या होत्या. कारण बारामती तालुक्यातील क्षेत्र असले तरी त्याची खरेदी मात्र दौंड तालुक्यातीलच दुय्यम निबंधक कार्यालयात होते.
दरम्यान या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. इतरांवर कारवाई करताना, मात्र या गुन्ह्यात पोपट तावरे याला वाचविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला अशी तक्रारदारांची तक्रार होती. दुसरीकडे तक्रारदाराचे साक्षीदार न घेता आरोपीलाच वाचविण्याचा प्रयत्न करीत त्याला अनुकूल साक्षीदारांचे जबाब घेऊन खोटी फिर्याद असल्याचे पोलिसांनी सिध्द करण्याचा प्रयत्न केला व आरोपीने तोपर्यंत अटकपूर्व जामीन घेतला, त्यामध्ये पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली. म्हणून आरती लव्हटे व किरण भोसले यांनी न्यायालयात खासगी फौजदारी दावा दाखल केला.
याची सुनावणी दौंडच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती जे. एस. खेडेकर- गोयल यांच्या समोर चालली. यामध्ये त्यांनी २१ सप्टेंबर रोजी हा आदेश दिला आहे. वरील चौघांवर गुन्हा दाखल करून याचा तपासाचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश यवत पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यास दिला आहे. या प्रकरणात आरती लव्हटे व किरण भोसले यांच्या वतीने अॅड. राजेश कातोरे, अॅड. अमित काटे व त्यांचे सहायक अॅड. संदीप येडे यांनी युक्तीवाद केला.