राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्या दौऱ्यापाठोपाठ आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज दौंड दौऱ्यावर आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याचा धसका खासदार सुप्रिया सुळेंनी घेतला की काय अशी चर्चा सध्या दौंडच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भारतीय जनता पक्षाने २०२४ ची लोकसभा निवडणुकां डोळ्यासमोर ठेवून विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाला लक्ष केले आहे. हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे खेचण्याची रणनीती भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी आखली आहे. तसे भाजपच्या अनेक नेत्यांनी जाहीरही केले आहे.
या मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या बारामती इंदापूर दौरा केल्यानंतर शनिवारी (दि.२४) दौंड तालुक्याचा दौऱ्यावर होत्या, त्यांनी उद्योजक, वकील, डॉक्टर यांच्याशी संपर्क साधला. यावेळी भाजपचे आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राम शिंदे तसेच भाजपचे जिल्ह्याचे पदाधिकारी व कार्यकर्तेही या दौऱ्यात सहभागी झाले होते.
याच पार्श्वभूमीवर आता बारामती लोकसभेच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. खासदार सुळे या आज मंगळवारी (दिनांक २७) दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत आणि विशेषतः आमदार राहुल कुल यांचा बालेकिल्ला असलेला राहु बेटातीत पारगाव, पिंपळगाव, नाथाचीवाडी, लडकतवाडी, देलवडी, उंडवडी, भोसलेवाडी व यवत ह्या गावांना भेट देऊन लोकांशी संपर्क करणार आहेत.
दरम्यान खासदार सुळे या दौंड मतदारसंघात पिछाडीवर राहिल्या आहेत. भाजप पुरस्कृत महायुतीचे उमेदवार रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर व भाजप पुरस्कृत उमेदवार कांचन कुल यांनी दौंड मधून मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत दौंडमधून पुन्हा पिछाडीवर राहू नये म्हणून त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्या दौऱ्याचा परिणाम या मतदारसंघात होऊ शकतो का? ह्याची चाचपणीही खासदार सुळे या दौऱ्यात करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. तर खासदार सुळे यांनी भाजपचा विशेषता केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या दौऱ्याचा धसका घेतल्यानेच त्या आज दौंड दौऱ्यावर असल्याची राजकीय चर्चा दौंड तालुक्यात रंगली आहे.