सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : या वर्षी गाळप हंगामामध्ये कर्मयोगीच्या कार्यक्षेत्रामध्ये ३८ हजार एकर नोंदीचा व बिगरनोंदीचा ५ हजार एकर असा एकूण ४१ हजार एकर उस गाळपाकरिता उपलब्ध होणार आहे. यामधून अंदाजे १६ ते १७ लाख टन ऊस गाळपाकरिता उपलब्ध होणार आहे. यंदाच्या हंगामात कर्मवीर शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना १५ लाख टन ऊस गाळप करणार असल्याची ग्वाही ‘कर्मयोगी’ चे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा हंगाम २०२२-२३ चा ३३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभावेळी हर्षवर्धन पाटील यांनी ही माहिती दिली. दरम्यान शारदोत्सवाच्या पहिल्या दिवशी कारखान्याचे ज्येष्ठ सभासद कुबेर आबा पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी कारखान्याच्या संचालिका शारदा कुबेर पवार या उभयतांच्या हस्ते पूजा झाली. राज्
याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी तथा कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धनजी पाटील यांचे शुभहस्ते व सर्व संचालक मंडळ यांचे उपस्थितीमध्ये बॉयलर अग्नीप्रदीपन झाले. कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी प्रास्ताविकामध्ये हंगाम २०२२-२३ चे पूर्वतयारीबाबत सर्व माहिती दिली.
यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, या वर्षी कारखाना हा ५ ऑक्टोबर रोजी विजयादशमीचे शुभमुहूर्तावर चालू करण्याचे नियोजन व्यवस्थापनाने केलेले आहे. त्या अनुषंगाने कारखान्यातील सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. मागील वर्षी कारखान्याने १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ मध्ये एकूण २.७५ लाख टन गाळप केले होते. तसेच नियोजन यावर्षी कारखाना प्रत्येक महिन्यामध्ये करणार आहे.
याकरिता लागणारी आवश्यक ती तोडणी वाहतुक यंत्रणा सज्ज केलेली आहे. यावर्षी कारखाना ज्यूस टू इथेनॉल हा पहिला प्रयोग करुन प्रतिदिन ७०० ते ८०० टन ज्यूस डिस्टीलरीकडे पाठविणार आहोत, जेणेकरुन या हंगामामध्ये ७५ ते ८० लाख लिटर व हंगाम समाप्तीनंतर बी हेवी ३० ते ३५ हजार टनापासून १.२० ते १.२५ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करण्याचे कारखान्याचे उद्दिष्ट आहे.
या हंगामामध्ये कारखान्याचे उत्पन्न वाढविण्याकरिता बायप्रॉडक्टचे उत्पादन व गुणवत्तेमध्ये पूर्वीपेक्षा वाढ करुन सभासदांना जास्तीत जास्त दर देणेस आम्ही प्रयत्न करणार आहोत असेही पाटील यांनी सांगितले.
यावेळी बॉयलर असोसिएशन यांनी यावर्षी जवळजवळ १९७ साखर कारखान्यांचे बॉयलरचा परफॉर्मंस पाहून आपले कारखान्यातील टेक्स्मॅको या बॉयलरला बेस्ट बॉयलरचे तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस मिळाल्याबद्रदल सर्व कर्मचारी व अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
मागील वर्षी कारखान्याचे साखर उता-यानुसार २४५०/- रुपये प्रतिटन एफआरपी बसत असताना २५०० रुपये प्रतीटन भाव देण्याचे जाहिर केल्यानुसार कारखाना लवकरच उर्वरित दर लवकरच ऊस उत्पादक सभासदांच्या खात्यामध्ये वर्ग करणार आहे असेही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमास कारखान्याचे शारदा पवार, पराग जाधव, छगन भोंगळे, वसंत मोहोळकर,रवींद्र सरडे, रतन देवकर, हनुमंत जाधव, भूषण काळे, विश्वास देवकाते, राहूल जाधव, अंबादास शिंगाडे, केशव दुर्गे, हिरालाल पारेकर, प्रदिप पाटील, शांतीलाल शिंदे, निवृत्ती गायकवाड, सतीश व्यवहारे, अशोक कदम, प्रविण देवकर, माजी व्हाईस चेअरमन माऊली बनकर, माजी संचालक सुभाष काळे, मानसिंग जगताप, शरद काळे, अभंग अण्णा, पांडुरंग गलांडे, विविध संस्थांचे पदाधिकारी भाउसो चोरमले, सुभाष बोंगाणे, महेंद्र रेडके, गोरख शिंदे, राघू काटे, पिंटू काळे, बळी बोंगाणे, बजरंग करे, संजय देहाडे आदी पदाधिकारी व सभासद, कार्यकारी संचालक देवराव लोकरे व सर्व खाते, विभागप्रमुख उपस्थित होते.