हर्षवर्धन पाटील यांच्या बालेकिल्ल्यातील लाखेवाडी सोसायटीवर श्रीमंत ढोलेंच्या सत्तेला भगदाड पाडण्याच्या मनसुबे उधळले..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : चार दिवसापूर्वी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी इंदापूर तालुक्यातील दोन ठिकाणी केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली, तर दुसरीकडे बारामती सहकार परिषद घेऊन 61 हजार सोसायट्यांना केंद्र सरकारने कशी मदत केली याचा पाढा वाचला. परंतु लाखेवाडीच्या सोसायटीत भाजपची काही डाळ शिजली नाही. नऊ गावातील शेतकरी सभासद असलेल्या सोसायटीत शेतकऱ्यांनी भाजपला नाकारले.

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या बालेकिल्ल्यातील स्वातंत्र्यपूर्व काळातील 90 वर्षांचा इतिहास असलेल्या व कोट्यावधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या लाखेवाडी विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी लाखेवाडी सोसायटी ताब्यात ठेवण्यात यश मिळवत सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकावला आहे. अतिशय प्रतिष्ठेची झालेल्या निवडणुकीत सोसायटी ताब्यात आली नसल्याने हर्षवर्धन पाटील यांना एक प्रकारे धक्का मानला जात आहे.
लाखेवाडी सोसायटी वर 13 पैकी 11 जागांवर श्रीमंत ढोले गटाच्या सदस्यांनी विजय संपादन केला असून ढोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीला स्पष्ट कौल दिला आहे. हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून तालुक्यात परिचित असणारे श्रीमंत ढोले यांनी अंतर्गत मतभेदाच्या कारणास्तव भाजप सोडला व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
त्यांनी ३ एप्रिल २०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, तत्कालीन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये लाखेवाडी गावात आपल्या हजारो समर्थकांसह प्रवेश केला होता.
याच दरम्यान हर्षवर्धन पाटील यांचे आणखी एक युवा खंदे समर्थक दीपक जाधव आणि इंदापूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे यांनीही हर्षवर्धन पाटलांची साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या झालेल्या प्रवेश कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातही झाली होती.
मात्र इंदापूर तालुक्यातील ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ज्यांनी प्रवेश केला त्यांच्यामागे मतदार नाहीत. मतदार आपल्याच बरोबर आहेत असे भाजपाकडून सभांद्वारे सांगण्यात आले होते. लाखेवाडी बावडा हा जिल्हा परिषद गट हा नेहमी हर्षवर्धन पाटील यांच्या हक्काचा गट मानला जातो. सध्या लाखेवाडी – बावडा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे या आहेत.
श्रीमंत ढोले यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षप्रवेशानंतर अगदी सहा महिन्याच्या आत पार पडलेल्या या लाखेवाडीच्या सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी आमने सामने मैदानात उतरले होते. गेली पाच वर्षे या सोसायटीवर तर श्रीमंत ढोले यांचे वर्चस्व होते.
त्यांनी सोसायटीवर पुन्हा वर्चस्व राखण्यासाठी व्यूहरचना केली होती. तर दुसरीकडे बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील आणि निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या नजीक असणारी ही सोसायटी ताब्यात घेण्यासाठी माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा ही पणाला लागली होती. त्यांच्याही गटाने सोसायटी ताब्यात घेण्यासाठी जोरदार तयारी केली होती.
लाखेवाडी, भोडणी, शेटफळ हवेली, बोराटवाडी, चाकाटी, पीठेवाडी, निरनिमगाव, टणू, बावडा आदींसह अन्य गावांचा समावेश असलेल्या या सोसायटीची सभासद संख्या १८०० हून अधिक आहे. त्यामुळेच या जिल्हा परिषद गटात या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व निर्माण झाले होते.
१९३२ साली स्थापना झालेल्या सोसायटीवरील ढोले यांची असणारी सत्ता उलटवून टाकण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या बड्या नेत्यांसह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कारखान्याचे आजी- माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन, आजी-माजी संचालक यांसह अनेकांनी ताकद लावली होती.
श्रीमंत ढोले यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर त्यांची स्वतःची ताकद किती आहे हे या निमित्ताने समजणार होते परंतु त्यांच्या राजकीय ताकदीपुढे सोसायटीच्या निवडणुकीत भाजपा काही टिकू शकली नाही. यात श्रीमंत ढोले यांच्या ताकद देण्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी विशेष प्रयत्न केले.