दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील रोटी येथील ग्रामदैवत रोटमलनाथ मंदिरातील १६ हजार ८०० रुपये किंमतीच्या सात पितळाच्या घंटा चोरीला गेल्याची तक्रार पुजारी श्रीहरी गाडे यांनी पाटस पोलीस चौकीत दिली आहे.
दौंड व यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील अनेक दिवसांपासून घरफोडी, रोहित्रे चोरी,शेती पंपाच्या इलेक्ट्रॉनिक मोटारी, शेतकऱ्यांची पाळीव जनावरे तसेच दुचाकी व चारचाकी वाहने चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. ह्या चोरीच्या घटना सुरू असताना आता चोरांची नजर मंदिरातील घंटा व दानपेटीवर पडली आहे.
यवत पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या पाटस पोलीस चौकीच्या हद्दीतील रोटी येथील ग्रामदैवत रोटमलनाथ मंदिरातील सात लहान मोठ्या पितळाच्या घंट्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दिनांक २३) रात्रीच्या सुमारास घडली आहे. मंदिराचे पुजारी श्रीहरी गाडे यांनी अज्ञात चोरट्यांनी अंदाजे १६ हजार ८०० रुपये किंमतीच्या पितळाच्या घंटा चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पाटस पोलीसांना आता या घंटाचोरांचा शोध घ्यावा लागणार आहे. दरम्यान, पाटस व कूरकुंभ एमआयडीसी परिसरात असलेल्या औद्योगिक कंपन्यांच्या वसाहतीमध्ये मोठ्या संख्येने परप्रांतीय वसाहत वाढली आहे. तसेच भंगार व्यवसाय करणाऱ्या व्यवसायांची संख्याही वाढली आहे. शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रॉनिक मोटारी, तसेच साहित्य चोरी करून चोरटे हे या भंगार व्यवसायिकांना विकत असल्याचा संशय शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे पोलिसांनी या भंगार व्यवसायिकांची सखोल चौकशी करावी अशी मागणी शेतकरी व नागरिक करीत आहेत.