सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
फक्त पुण्या मुंबईत नाही, तर अगदी इंदापूर बारामतीच्या वाडीवस्तीपर्यंत मोबाईलवरून हनीट्रॅप घडवून आणणाऱ्या टोळ्यांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. मागील आठवड्यात इंदापूर आणि बारामतीतील बाराहून अधिक नोकरदार, युवक हनीट्रॅपचे शिकार झाले आहेत. प्रतिष्ठा आणि समाजात हसू होऊ नये म्हणून, नाईलाजाने 80 हजारापासून अगदी लाख, दोन लाखापर्यंतची रक्कम त्यांनी गमावली आहे.
व्हाट्सअपवर अचानक एखाद्या अनोळखी महिलेचा हाय, हॅलो येतो आणि त्यानंतर हळूहळू चॅटिंगला सुरुवात होते. ही चॅटिंग हळूहळू थेट प्रेमापर्यंत जाते. मात्र याला अगदी महिना, दोन महिने किंवा वर्षाचा कालावधी नाही, तर फक्त काही तासांचा अथवा काही दिवसांचा कालावधी जातो.
या अनाहूत ओळखीनंतर संबंधित महिला अगोदर व्हाईस कॉल आणि त्यानंतर सावज टप्प्यात आल्याचे दिसताच व्हिडिओ कॉल करू लागते. हे व्हिडिओ कॉल करून स्वतः अर्धनग्न होते आणि त्यानंतर समोरील युवकाला देखील अशाच स्वरूपाची मागणी केली जाते आणि तिथेच या मोबाईलधारकाचा बळी जातो.
पहिल्या दिवशी अशा प्रकारचे कॉलिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानक फोन येतो, तो दिल्ली क्राईम ब्रँचकडून! अर्थात तो कुठल्याही पोलीस ठाण्याचा नसतो, तर या टोळीचाच एक भाग असतो. यामध्ये संबंधित तोतया पोलीस अधिकारी सुरुवातीला त्या मोबाईलधारकाला काल काही चॅटींग केले का? असा प्रश्न विचारतो. आमच्याकडे सगळे रेकॉर्डिंग आहे, तुझ्या विरोधात सायबर गुन्हा दाखल करत असून, संबंधित युवतीने आत्महत्या करीत असल्याचा अर्ज आमच्याकडे दिला आहे असे सांगितल्यानंतर त्याची भंबेरी उडते.
त्याचबरोबर तुझे हे कारनामे आम्ही तुझ्या व्हाट्सअप वरील असलेल्या फ्रेंड लिस्टवरील सर्वांना पाठवू अशी देखील धमकी दिली जाते. जर हा युवक असेल तर ठीक, मात्र तो व्यक्ती विवाहित असेल, तर मात्र संबंधित व्यक्ती घाबरून जाते आणि तिथेच या टोळीचे निम्मे काम फत्ते होते. मग
त्यानंतर हे प्रकरण मिटवण्याचा फंडा दिला जातो. यामध्ये एक मोबाईल नंबर दिला जातो. या नंबरला फोन करून युट्युबवरील अपलोड केलेले व्हिडिओ काढून टाकण्यास सांगावे अशी सूचना केली जाते. मग संबंधित मोबाईलवर फोन केल्यास, ती व्यक्ती आढेवेढे घेण्यास सुरुवात करते. ते युट्युब वरील व्हिडिओ काढून टाकतो, मात्र माझे नुकसान होईल, ते पैसे देऊन टाक अशी तो मागणी करतो.
हे नुकसान 70 हजारापासून दोन लाखापर्यंत असते. काही जण याला बळी पडतात. मागील दहा ते पंधरा दिवसात इंदापूर आणि बारामती तालुक्यातील काही जणांना अशा प्रकारचा गंडा घालण्यात आला आहे. ही प्रकरणे समोर आलेल्यांपैकी आहेत, मात्र कोणत्याही प्रकारची उलटी पोलीस कारवाई करण्यास हे लोक कचरत आहेत.
तुम्ही जर एकटे असताना अशा फिल्म इंटरनेटवरून पाहत असाल तर!
अर्थात झालेल्या निरीक्षणानुसार जे व्यक्ती अश्लील फोटो, अश्लील मेसेज अथवा पॉर्नशी संबंधित व्हिडिओ चॅटिंग अथवा इतर इंटरनेट साईट पाहत असतील, अशा लोकांना यातून हेरले जाते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स यंत्रणेचा वापर करून या मोबाईल धारकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ही टोळी करते. या टोळीतील काहीजण निष्णात तंत्रज्ञ असल्याने सध्या गुन्हेगारीचा हा नवा फंडा अनेक जणांना खड्ड्यात घालतो आहे.
अॅड. अविनाश झणझणे, इंदापूर- बारामती : मागील आठवड्यात इंदापूर तालुक्यातील चार ते पाच प्रकरणे माझ्यासमोर आलेली आहेत. बारामती तालुक्यातूनही अशी दोन प्रकरणे माझ्यासमोर आलेली आहेत. मुळात खरोखरच असे काही घडले, तर पुढे कायदेशीर सल्ला काय घ्यायचा? या हेतूने आलेली ही मंडळी जेव्हा हे सगळे एक प्रकारचा इकॉनॉमिक ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार आहे असे लक्षात घेतात, तेव्हा पोलीस कारवाई करण्याची त्यांची तयारी नसते. मात्र काही जणांना यामध्ये नुकसान सोसावे लागलेले आहे. त्यामुळे अनोळखी कोणत्याही महिलांशी अथवा अनोळखी लोकांशी कोणतेही चॅट करताना काळजी घेण्याची गरज आहे.