सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : एरवी लहान मुलांना जवळ घेऊन मायेने खेळणी व चॉकलेट देणाऱ्या आमदार दत्तात्रय भरणे यांनाच आता निमगाव केतकी गावातील लहान मुलांनी चॉकलेट देऊन त्यांचे अनोखे स्वागत केले आहे.
सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळून काम करणारे नेते म्हणून आमदार दत्तात्रय भरणे यांची ओळख झाल्याने त्यांची लोकप्रियता वाढली गेली. लहान मुलांमध्ये तर भरणे यांची विशेष क्रेझ निर्माण झालेली दिसून येत आहे. अनेकवेळा आपुलकीने जवळ घेत लहान मुलांच्या इच्छा कधीच न मोडणा-या भरणे यांनी मुलांना खेळणी, चॉकलेट देऊन त्यांच्याशी आपुलकीने बोलत त्यांच्या मनात घर केल्याने भरणे यांची मामा म्हणून ओळख आणखीच गडद झाली.
राज्यमंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद असताना भरणेंनी अंगरक्षकासह सुरक्षा यंत्रणेचा लवाजमा धुडकावलेला व सर्वसामान्यात जाऊन त्यांच्याशी हितगुज करत त्यांचा साधेपणा संबंध महाराष्ट्राने अनुभवला आहे. तालुक्यात फिरताना सर्वसामान्य माणसात जाऊन त्यांच्या सुखदु:खात दिसून येतात. त्याचबरोबर लहान मुलांमध्ये तर भरणे अगदी दिलखुलासपणे रमून जातात, हे अनेकदा दिसले आहे.
आज (रविवार) निमगाव केतकी येथेही तसेच दिसून आले. आमदार दत्तात्रय भरणे हे तेथे एका कामानिमित्त गेले असता, त्यांचा ताफा थांबताच शुभ्रा अमोल दोशी व अथर्व अमोल दोशी ही मुले धावत भरणे यांच्याकडे आली व त्यांनी हातातील चॉकलेट मामांना देत अनोख्या पद्धतीने स्वागत केले. लहान मुलांकडून अशा अनोख्या पद्धतीने स्वागत झाल्याने श्री.भरणेही भारावून गेले होते.