किशोर भोईटे,सणसर महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील प्रमुख गावांपैकी असलेले एक गाव म्हणजे सणसर.! गावच्या ग्रामपंचायतीची स्थापना 1936 साली झाली. तेव्हापासून इतिहासातील सर्वात तरुण सरपंच म्हणून पार्थ दत्तात्रेय निंबाळकर यांची वयाच्या 28 व्या वर्षी गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
छत्रपती कारखान्याचे संचालक अॅड रणजीत निंबाळकर यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी पार्थ निंबाळकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी त्यांनी सणसर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन पदही भूषविले आहे.
पार्थ निंबाळकर सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून काम करत असल्याने त्यांच्या निवडीमुळे सर्व स्तरातून आनंद व्यक्त होत आहे. असे असले तरी गावचा सर्वांगीण विकास करण्याची, गावात नवनवीन प्रयोग राबवून गावाची वाटचाल स्वच्छता,पर्यावरण पुरक ग्राम निर्माण करणे, गावात आरोग्य, पाणीपुरवठा,प्लास्टिक मुक्त गाव निर्माण करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. यावर त्यांच्याकडून निश्चित उपाययोजना होतील असा विश्वास ग्रामस्थांना आहे.
पार्थ निंबाळकर, नवनियुक्त सरपंच –
ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावचा नावलौकिक वाढवणे,नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन सर्व प्रभागांमध्ये समान विकास करण्यावर माझा भर असणार आहे.गावाचे नाव जिल्ह्यात आणि राज्यात आदर्श करण्यासाठी मी सर्वांच्या सहकार्याने काम करुन माझ्यावर गावकऱ्यांनी टाकलेली जबाबदारी मी विकास कामाच्या रूपाने सार्थ करून दाखवणार आहे.