शिरूर – महान्यूज लाईव्ह
एफआरपी रक्कम वेळेत देणे गरजेचे असताना ती उशिरा देण्यात आली, मात्र कारखान्याचे चेअरमन उशिरा एफआरपी रक्कम देऊन ही स्वतःची वाहवा करून घेत आहेत. ही सभासदांची दिशाभूल करणे थांबवा अशी टीका सुधीर फराटे इनामदार यांनी केली.
घोडगंगा किसान क्रांतीच्या वतीने मांडवगण फराटा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फराटे हे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की,रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला या १५ दिवसांत ३५ व २० कोटी असे ५५ कोटी तारण कर्ज आगामी ऊस गळीत हंगाम चालू करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने दिले आहेत.
फराटे म्हणाले, नागरगाव येथे नुकत्याच झालेल्या सभेत कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार म्हणाले की, नागवडे कारखान्याला ८० कोटी मिळाले, मग आपल्याला कर्ज देताना सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे. हा आरोप मात्र ते राजकीय हेतूने करीत असून ते राज्य सहकारी बँकेची बदनामी करत आहेत.
कर्जाची रक्कम ही मागील गळीत हंगामात किती गाळप केले यावर ठरत असते. १४ दिवसात एफआरपी देणे बंधनकारक असताना घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांनी एफआरपी उशिरा देऊन प्रसिद्धीच्या माध्यमातून स्वतःची वाहवा करून घेतली.
मात्र दोन दिवसांपूर्वी जमा झालेली एफआरपी ही गेल्या हंगामातील आहे. एफआरपी देणे हा कायदेशीर हक्क आहे. एफआरपी मिळाली नाही म्हणून साखर आयुक्त यांनी कारखान्याला जप्तीची नोटीस बजावली होती . तसेच मागील हंगामात कारखान्याला २ कोटी ६० लाख रुपये दंड झाला आहे अशी माहिती फराटे यांनी दिली.