राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
राज्यात पाळीव जनावरांना होत असलेल्या लंपी स्किन या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. ग्रामीण भागातही पाळीव जनावरे हळूहळू मोठ्या संख्येने बाधित होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी होणाऱ्या बैलपोळा सणावर संकट निर्माण झाले आहे. कारण बैलपोळा सण साजरा न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बैलपोळा सणावर कडक निर्बंध लावले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपात्ती विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहेत.
पुणे जिल्ह्यात बैल, गाय आदी पाळीव जनावरांना लंपी ह्या संसर्जन्य रोगाने ग्रासले असून मोठ्या प्रमाणात जनावरे बाधीत झाली आहेत. पुणे जिल्ह्यात या रोगांमुळे जनावरे दगावल्याच्याही घटना घडत आहेत. या रोगाला अटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन लसीकरण सुरू केले आहे.
या आजाराला लवकरात लवकर आळा बसावा यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्न करीत आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी (दि.२५) पुणे जिल्ह्यातील होणारा बैलपोळा हा सण होत आहे. लंपीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांचा बैलपोळा हा सण मोठ्या संकटात सापडला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही अनेक सण उत्सव रद्द करण्यात आले होते. लंपीच्या पार्श्वभूमीवरही जनावरांच्या सुरक्षिततेसाठी बैलपोळा हा सण रद्द करण्याचे निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने आदेश जारी केला आहे. लंपी संक्रमण बाधित गुरे,लंपी संक्रमण अबाधित गुरे, जिवंत अथवा मृत गुरे, संक्रमणबाधित गुरांच्या संपर्कात आलेले वैरण, सावलीसाठी वापरले गेलेले गवत, जनावरांचे शव, कातडी, शरीरातील भाग इत्यादीवर नियंत्रण क्षेत्रातून बाहेर वाहतूक करण्यासाठी बंदी करण्यात आली आहे.
तसेच लंपी संक्रमण रोखण्यासाठी बैल, गुरे, गायी, म्हशी यांच्या वाहतूकीवर तसेच बाजार भरवणे, शर्यती भरवणे, जत्रा व प्रदर्शनावर बंदी घातली आहे. नियंत्रण क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी ही प्रशासनाने हे निर्बंध घातले आहेत.
परिणामी ग्रामीण भागात शेतकऱ्यांना यंदा बैलपोळा हा सण साजरा करता येणार नाही. ग्रामीण भागात शेतकरी गाई बैलांना व आपल्या पाळीव जनावरांना रंगरंगोटी सजावट करून वाजत गाजत गावातून मिरवणुका काढतात. ग्रामदैवत मंदिरांना प्रदक्षिणा घातली जाते. मात्र लंपी रोगाच्या संकटामुळे शासनावर निर्बंध आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.