मुंबई – महान्यूज लाईव्ह
शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केलेला अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला परवानगी देण्यात आली आहे, त्याचे शिवसेनेने स्वागत केले आहे. दरम्यान या निर्णयाविरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.
२ ते ६ ऑक्टोबर दरम्यान शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे यांना परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेचे वकील अॅस्पी चिनॉय यांनी बाजू मांडली, तर सदा सरवणकर यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. त्यासाठी जनक द्वारकादास यांनी बाजू मांडली.
खरी शिवसेना कोण यावर आम्ही कोणतेही मत व्यक्त करणार नाही. मात्र कायदा व सुव्यवस्थेचे कारण सांगून महापालिका या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारू शकत नाही, गेल्या सात दशकात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता का? असा सवाल करीत उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले. दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शिवसेना जबाबदार असेल, पालिकेच्या नियमांचे उल्लंघन होता कामा नये असे न्यायालयाने बजावले आहे.
दरम्यान उध्दव ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलताना प्रत्येक पालिका जिंकायचीच आहे, शिवरायांचा भगवा फडकवयचाच आहे. निवडणूका आल्यानंतर गटतट, रुसवे, फुगवे आणू नका, उमेदवारी मोजक्याच लोकांना देता येते, उमेदवारी म्हणजे भगवा झेंडा हे समजून काम करा असा सल्ला दिला.