पुणे – महान्यूज लाईव्ह
भाजपच्या मिशन १४५ या लोकसभा मतदारसंघाच्या व्यूहरचनेतील दत्तक पालकमंत्री म्हणून बारामती लोकसभेसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची निवड झाली आहे. त्या कालपासून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल खडकवासला व भोर मतदारसंघातील विविध बैठकांना उपस्थिती दाखवली.
या बैठकीदरम्यान सितारामन यांना पदाधिकाऱ्यांनी जे महत्वाचे मुद्दे सांगितले, त्यावरून त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा फंडा सांगून टाकला आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचा मंत्र दिला.
आसाम, पश्चिम बंगालसह इतर राज्यात हातपाय पसरताना भाजपने ज्या व्यूहरचनेची आखणी केली होती, तीच व्यूहरचना बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत निर्मला सितारामन यांनी सांगून टाकली.
बारामती लोकसभा मतदारसंघातील वातावरण सतत कोणत्या ना कोणत्या कारणांनी भाजपला धुमसत ठेवायचे आहे असा जो आरोप राष्ट्रवादीचे पदाधिकारी करतात, त्याला काहीसा समांतर हा मुद्दा आहे, मात्र तो राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा बनणार का? हा खरा प्रश्न आहे.
निर्मला सितारामन यांनी जो महत्वाचा मुद्दा सांगितला तो असा आहे की, बारामतीत सर्वाधिक मतदान राष्ट्रवादीला होते, अगदी एकतर्फी होते, खडकवासल्यात भाजप एकतर्फी चालतो, तर भोर, पुरंदर, इंदापूर व दौंड तालुके काहीसे बरोबरीने चालतात. अशावेळी बारामतीतील मताधिक्य कमी करायचे, तर तेथे काही क्लृप्त्या कराव्या लागतील.
व्यवसायाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने येथे आलेल्यांवर अधिक लक्ष ठेवा. त्यांच्याशी मैत्री करा. त्यांना आपलेसे करा. त्यांचे छोटे- छोटे प्रश्न असतील, तर त्यात आक्रमकपणे लक्ष घाला. त्यांना मतदार करून घ्या. त्यांचे प्रश्न गांभिर्याने समजून घेऊन ते मांडा. बारामतीच्या कित्येक गावात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यावर आक्रमकपणे बोला. राष्ट्रवादीत खूप भ्रष्टाचार आहे, त्यांचे नेते भ्रष्टाचारी आहेत. त्यामुळे ते तुरुंगात गेले आहेत. अनेकांच्या चौकशा सुरू आहेत. ते आक्रमकपणे मांडा.
जोवर तुम्ही सोशल मिडियात आक्रमकपणे हे मांडत नाही, तोवर लोक तुमच्याबरोबर येणार नाहीत. हे मांडत नाही, त्यामुळेच बारामती मतदारसंघात भाजप बचावात्मक स्थितीत राहतो. आता तसे मुळीच करू नका. सतत येथील प्रश्न आक्रमकपणे मांडत राहा. आजपासूनच मांडत राहा. २०२४ ची निवडणूक आपलीच असेल असा पहिला कानमंत्र निर्मला सितारामन यांनी दिला आहे.
आता यावर राष्ट्रवादी प्रत्युत्तरादाखल नेमक्या कोणत्या उपाययोजना करते आणि या व्यूहरचनेला जशास तसे काय उत्तर तयार करते यावर पुढील राजकीय हालचाली अवलंबून आहेत. मात्र भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघात पुढील काळात नेमके काय करणार याचा पहिला बॉम्ब फोडून दाखवला आहे.