पुणे – महान्यूज लाईव्ह
दौंडचे भाजपचे आमदार राहूल कुल यांनी भाजपच्या नेते, कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली, ती थेट निर्मला सितारामन यांच्यासमोर.. केंद्रीय नेते बारामतीत येतात, ते बारामतीमध्ये येऊन कौतुक करतात. त्या ठिकाणी नसलेले मॉडेल खूप छान असल्याचे सांगतात, त्यातून कार्यकर्त्यांचा संभ्रम होतो, मग आपण बारामती कशी जिंकणार?
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मंडल अध्यक्ष व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक बैठकीत हा मुद्दा पुढे आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या भाषणाअगोदर राहूल कुल यांनी वरील मत व्यक्त केले, त्यानंतर मात्र निर्मला सितारामन यांनी जोरदार बॅटींग करीत भाजपच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागवला.
त्यांनी सांगितले की, पक्षाच्या केंद्रीय स्तरावर आणि दिल्लीतून यापुढे बारामतीबाबत कोणतीही तडजोड होणार नाही. आताच तुम्ही २०२४ च्या तयारीला लागा. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नका. माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, आपला पक्ष बारामतीत बचावात्मक राहतो. राष्ट्रवादीचे नेते भ्रष्टाचारामुळे तुरुंगात आहेत, अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या आहे. आक्रमकपणे मांडा, सोशल मिडीयात लिहीत राहा. मग लोक तुमच्याबरोबर येतील, बोलायला लागतील. बोगस मतदार कमी करा.
पवारांनी द्राक्षाबाबत काहीच केले नाही असे सांगताना निर्मला सितारामन म्हणाल्या, सन २०१४ पूर्वी शरद पवार हे केंद्रीय कृषीमंत्री होते. मात्र द्राक्ष उत्पादन घेताना रसायन वापराबाबत कठोर निर्णय घेतले होते. त्यामुळे निर्यातीला मर्यादा आली. ही समस्या शरद पवार कृषीमंत्री असताना निर्माण झाली होती. मात्र त्यावर पवार यांनी काहीच केले नाही. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेऊन नितीन गडकरी माझ्याकडे आले आणि त्यानंतर मोदी सरकारने त्यावर तोडगा काढला.