किशोर भोईटे -महान्यूज लाईव्ह
निंबोडी (ता. इंदापूर जि पुणे) गावचे सुपूत्र व पिंपरी चिंचवड, पुणे येथे सध्या नोकरीनिमित वास्तव्यास असणाऱ्या निलेश नारायण घोळवे यांनी इटली येथील जगातील अतिशय खडतर अशी आयर्नमॅन ही जागतिक स्तरावरील स्पर्धा विक्रमी वेळेत यशस्वीरित्या पूर्ण केली.
आयर्नमॅन या स्पर्धेतील समुद्रामध्ये पोहणे 4 कि.मी, सायकलिंग 180 कि.मी व धावणे 42 कि.मी हे सर्व प्रकार श्री. निलेश घोळवे यांनी सलग 13 तास व 57 मिनिटांमध्ये पूर्ण केले. त्यासाठी त्यांना 16 तास वेळ देण्यात आला होता. या स्पर्धेसाठी जगभरातून 2500 स्पर्धक सहभागी झाले होते.
निलेश घोळवे हे पुण्यातील चाकण येथील नामांकित कंपनीमध्ये उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम पाहतात. त्यांच्यासह पिंपरी चिंचवड येथील तिघांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.
18 सप्टेंबर 2022 रोजी चेर्व्हिया, इटली ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मेनन फिटनेस सिस्टीम या ग्रुपमधील निलेश घोळवे, मंगेश कोल्हे व ज्योतीराम चव्हाण यांनी भाग घेतला व त्यामध्ये तिघांनीही आयर्न मॅन किताब पटकावला.
खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात 4 किमी पोहणे, हेड विंड, क्रॉस विंड मध्ये 180 किलोमीटर सायकल चालवणे आणि दिवसा गरम व रात्री थंड वातावरणात 42 किमी धावणे हा अतिशय खडतर प्रवास पूर्ण करणे जिकीरीचे काम होते. ते काम या तिघांनी अतिशय जिद्दीने पूर्ण केले.