पुणे महान्यूज लाईव्ह
सात वर्षापूर्वी एका शेतकऱ्याला त्याच्या खरेदी केलेल्या जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर मालकीची नोंद लावण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला पकडले होते. त्याची सुनावणी कोर्टात चालली आणि शेवटपर्यंत तक्रारदार, साक्षीदार व पुरावे भक्कम राहील्याने या तलाठ्याला चक्क पाच वर्षांची सक्तमजूरी व १ लाख रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
१६ नोव्हेंबर २०१५ रोजी भोर तालुक्यातील सारोळा येथील तलाठी सीमा सुभाष कांबळे हिने शेतकऱ्याने खरेदी केलेल्या शेतजमीनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी दीड हजारांची लाच मागितली. ती लाच स्विकारताना तिला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने पकडले होते.
त्यानुसार १६ नोव्हेंबर रोजी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अरूण घोडके यांनी तपास केला होता. व त्याचे दोषारोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले होते.
त्याची सुनावणी शिवाजीनगर विशेष न्यायालयाचे न्यायाधिश पी.पी. जाधव यांच्यासमोर चालली. यामध्ये सरकारी पक्षाने केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायाधिशांनी सीमा सुभाष कांबळे हिच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायदा ७, १३ अन्वये ५ वर्षे सश्रम कारावास व १ लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिन्यांचा साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली.
या खटल्यात सरकारी वकील म्हणून प्रेमकुमार अगरवाल व चंद्रकिरण साळवी यांनी कामकाज पाहिले. पोलिस नाईक जगदिश कस्तुरे व पोलिस हवालदार अतुल फरांदे यांनी सरकार पक्षास सहाय केले.