लोणंद – महान्यूज लाईव्ह
लोणंद येथील कुमार गॅस एजन्सीचे मालक अमित तापडीया त्यांच्या कार्यालयात बसले असताना त्यांना एक पत्र येते.. ते पत्र असते, येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहाच्या तुरूंगाधिकारी कक्षाकडील.. पत्र फोडताच अमित तापडीयांना धक्काच बसतो.. का? तर त्यांना चक्क तुरुंगातल्या गुंडाने थोडे थोडके नव्हे ५० लाख मागितलेले असतात..!
लोणंद येथील २७ एकर जमीनीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी ही ५० लाख रुपयांची खंडणी एका गुंडाने थेट येरवडा कारागृहातून मागितली या कारणावरून लोणंद पोलिसांनी जेलबंद गुंड परवेझ हनिफ शेख याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, लोणंद येथे शेख याने २७ एकर जमीन घेतली आहे. मात्र हा जमीनीचा व्यवहार अधांतरीच आहे. हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी शेख याने थेट तापडीया यांनाच ५० लाख मागितले. त्यामुळे तापडीया यांनी लोणंद पोलिस ठाणे गाठले व शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
परवेझ शेख हा चंदन सेवानी हत्याकांडातील प्रमुख आरोपी आहे. चार जानेवारीला व्यापारी सेवानी यांचे खंडणीसाठी अपहरण करून त्यांचा सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे गोळ्या घालून खून केला होता. या प्रकरणी सातारा आणि पुणे पोलिसांनी सात जणांना अटक केली होती. शेख हा या टोळीचा प्रमुख होता. त्याच्याकडून सात पिस्तूले, ५८ काडतुसे असा शस्त्रसाठा जप्तही केला. शेख याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, त्याची पुणे, सातारा, सांगली परिसरात दहशत आहे. शेख याच्यासह सातही जणांवर मोक्काअंतर्गत कारवाईही करण्यात आली आहे.