शिरूर – महान्यूज लाईव्ह
शेतात बेवारस स्थितीत आढळलेल्या नवजात बालकाला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी मायेची ऊब दिलीच परंतु अनोखे माणुसकीचे दर्शन ही घडविले. .
याबाबत सविस्तर असे की, रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत शेळकेवस्ती येथील भास्कर लांडे यांच्या शेतात कैलास मुंडे हे गुरे चारण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना रडण्याचा आवाज असताना त्यांनी लिंबाच्या झाडाजवळ जाऊन पाहिले असता, चार ते पाच महिन्याचे बालक बेवारस स्थितीत मिळून आले.
यावेळी त्यांनी सदरील माहिती पोलिसांना कळवली. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे, हवालदार गुलाब येळे, महिला पोलिस कॉन्स्टेबल मोनिका वाघमारे यांनी भेट दिली. सदर बालकाच्या आई वडिलांचा, नातेवाईकांचा पोलिसांनी शोध घेतला.परंतु त्यास यश आले नाही.
यावरून रांजणगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सदर बालकास पोलिसांनी हॉस्पिटल मध्ये जाऊन तपासणी केली असता, बालकास ताप असल्याचे लक्षात येताच उपचार केले.तसेच बालकास बालकल्याण समिती सदस्या संध्या गायकवाड यांच्या समोर हजर करत कोरेगाव पार्क येथील भारतीय समाजसेवा केंद्र अधिक्षिका यांच्याकडे सुपूर्द केले.
दरम्यानच्या काळात रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन च्या पोलिस कॉन्स्टेबल मोनिका वाघमारे यांनी बालकास जवळ घेत मायेची ऊब दिली, इतकेच नव्हे तर वेदांतअसेही नामकरण पोलिसांनी केले. तसेच बालकाच्या रडण्याने उपस्थित पोलिसांना देखील गहिवरून आले.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे या करत आहेत. रांजणगाव येथे बालकाच्या उपचारकामी वैद्यकीय अधिकारी डॉ. गार्गी, लॅब टेक्निशियन वैशाली नेमाडे, परिचारिका काजल दावडे यांनी सहकार्य केले.