दौंड : महान्यूज लाईव्ह
जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी पाटस ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गासाठी सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामासाठी दौंड तालुक्यातील रोटी येथील काही ग्रामस्थांची घरे पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आली. ह्या प्रकारामुळे रोटी येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या महामार्गाचे काम करणाऱ्या संबंधित कंपनीच्या ठेकेदाराकडून दमदाटी व जबरदस्तीने घरी पाडली जात असल्याचा आरोप नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी केला आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम पाटसपासून बारामतीपर्यंत जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. दौंड तालुक्यातील रोटी येथे गावातून हा महामार्ग जात आहे. महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि महामार्गाच्या देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना कोणतेही पूर्वकल्पना व नोटीस न बजवता अचानक घरे पाडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
जेसीबी पोकलेन मशीनच्या सहाय्याने घरे पाडण्यास सुरुवात करण्यात आली असे या ग्रामस्थांचे म्हणणे असून या महामार्गाचे काम करणाऱ्या संबंधित कंपनीच्या ठेकेदाराकडून विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना कामात अडथळा आणला तर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली असा आरोप ह्या ग्रामस्थांनी केला आहे.
महामार्गाचे काम करण्यास आमचा विरोध नाही मात्र. आम्हाला या जागेचे मूल्यांकन व नुकसान भरपाई मिळावी अशी नुकसानग्रस्त ग्रामस्थांची मागणी आहे. याबाबत बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे वारंवार लेखी तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला.
शासनांकडून आम्हाला न्याय दिला जात नसल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत दरम्यान, या कामास ठराविक ग्रामस्थांचा विरोध होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. नियमानुसार गावठाण जागेतील घरे पाडण्यात आली असल्याचा दावा ह्या संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान आज पालखी महामार्गाचे अधिकारी संदेश नवत्री, संबंधित कंपनीचे ठेकेदार चे कर्मचारी महेश सरदार व ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक चकमक ही उडाली. पाटस मंडलाधिकारी एस.एन. गायकवाड, तलाठी रोहन गबाले म्हणाले की वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वस्तुस्थितीचा पंचनामा करून वरिष्ठ कार्यालयास हा अहवाल पाठवला जाईल. यावेळी पाटस पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला होता.