सलमान मुल्ला, उस्मानाबाद
कळंब तालुक्यात लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा सोशल मिडियावर फिरू लागल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली असून पोलिसांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यात मुलांचे अपहऱण करण्याच्या अफवेवरून साधूंना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता विविध जिल्ह्यांत अशा अफवा पसरवल्या जात असल्याने पोलिसही सतर्क झाले आहेत.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या फक्त अफवा असून कळंब तालुका अथवा परिसरात कोठेही लहान मुलांचे अपहरण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान अशा कोणत्याही टोळीची माहिती अथवा नोंद नसून सतर्कता म्हणून पोलिसांनी २४ तास गस्तीलाही सुरवात केली आहे. शाळा, महाविद्यालये, मुख्याध्यापक व शिक्षकांनीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, मात्र तसे काही आढळून आल्यास जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शाळेतून मुले पळवून नेल्याची अफवा पसरली आणि नागरिकांनी शाळेत धाव घेतली.
दरम्यान ही अफवा पसरण्याबरोबरच अशाही काही घटना घडत आहेत. कळंब येथील एका शाळेतून लहान मुले पळवून नेल्याची अफवा पसरल्यानंतर पालकांनी थेट शाळेत धाव घेतली. अचानक पालकांची गर्दी पाहून शिक्षकही अचंबित झाले. मात्र काही वेळानंतर ही अफवा असल्याचे निदर्शनाल आल्यानंतर पालक निघून गेले. मात्र या घटनेनंतर पोलिसांनी अशा अफवा पसरवणाऱ्यांवरही कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.