बारामती – महान्यूज लाईव्ह
गेल्या काही महिन्यांपासून गावातला तलाठी सर्वांना व्हाटसअपवर आपली पीक पाहणी आपणच करा असे सल्ले देतोय.. त्याने काम चांगले केले.. पण तांत्रिक मुद्दा म्हणजे ते अॅप गेल्या काही दिवसांपासून सगळ्या ठिकाणी काही व्यवस्थित चालत नाही आणि पीक पाहणी काही मनाजोगती होत नाही. सोसायटीचा सचिव म्हणतो सातबाऱ्यावर पीक पाहणी करून आणा.. तलाठी म्हणतो आमच्या हातात आता काय राहीलं नाय..आणि बॅंकेचा अधिकारी म्हणतो आता मी काय करू? पीक पाहणीच्या अॅपकडे पाहून आता बळीराजा कुठं पाप केलं होतं असे म्हणायचाच उरलाय.
गावागावातले तलाठी पीकपाण्याची नोंद करण्यासाठीही पैसे घेतात म्हणून शेतकऱ्यांचा त्रास वाचविण्यासाठी राज्य शासनाने ई पीक पाहणीचे अॅप आणले. ही गोष्ट अत्यंत चांगली झाली आहे. हे अॅप आणून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृतीही केली. या पीक पाहणी अॅपमध्येच तुम्ही तुमची माहिती जमा करा, त्याखेरीज तुम्हाला पीकपेरा मिळणार नाही आणि पीककर्जासाठीही तुम्ही पात्र होणार नाही असे सांगितल्यानंतर शेतकरीही खडबडून जागे झाले आणि त्यांनी या अॅपला डाऊनलोड, इन्स्टॉल करून शेतात जाऊन पीकांचे फोटो काढले आणि त्यात भरले.
पीक पाहणी पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या हातात आणून देऊन शासनाने मोठा दिलासा दिला आहे. पीक पाहणी केल्यानंतर ४८ तासांमध्ये त्याची नोंद तांत्रिकदृष्ट्या निश्चित होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या अॅपमध्ये काही सुधारणा केल्या जात असल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली. त्यामुळे या अॅपच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला असल्याने त्याचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
काही ठिकाणी हे अॅप चालत नाही. त्यातील तांत्रिक दोषांमुळे जिथे पुरेपूर रेंज आहे, तिथेही ते चालत नाही अशा शेतकऱ्यांकडून तक्रारी येऊ लागल्या आहेत. आता हे अॅप मोठ्या संख्येने शेतकरी त्यावर काम करीत असल्याने सर्व्हर डाऊन होते की, मुद्दाम केले जातेय हे कळायला मार्ग नाही. मात्र आगीतून उठून फुफाट्यात पडलो अशी अवस्था शेतकऱ्यांची मात्र झाली असल्याचे शेतकरी सांगतात. अनेक शेतकऱ्यांनी पीक पाहणी यशस्वीरित्या पूर्ण झाली नसल्याने त्याची नोंद सातबाऱ्यावर येत नाही आणि त्यामुळे कर्जाचे नवेजुने ही करता येत नसल्याचे सांगितले.
ज्ञानेश्वर पोमणे, सरपंच बाबुर्डी, ता. बारामती – अनेक शेतकऱ्यांची या अॅपमधील तांत्रिक दोषांमुळे मोठी अडचण झाली आहे. वेळेत जर कर्जाचे नवेजुने केले, तर व्याजाचा मोठा फटका बसत नाही. मात्र कित्येक शेतकरी नवे पीककर्ज घेण्यास अपात्र ठरण्याची भिती असल्याने त्यांना अल्पव्याज दराच्या योजनेचा लाभही मिळणार नाही. शिवाय व्याजाचा मोठा भुर्दंड बसणार आहे. त्याची गांभिर्याने दखल घेऊन सरकारी यंत्रणेने आपली छाती खोटी फुगविण्यापेक्षा जमीनीवर येऊन वास्तवाचा अभ्यास करावा व प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहून तातडीने उपाययोजना कराव्यात.
दरम्यान काही गावकामगार तलाठ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र येत्या दोन तीन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ववत होईल, काही शेतकऱ्यांना त्याचा त्रास झालेला आहे, मात्र कर्ज भरल्याची नोंद काही सोसायट्यांनी शेतकऱ्यांनी स्वतः दाखल केलेल्या या अॅपमधील माहितीनुसार खरी मानत नवे जुने केले आहे, ती मदत इतरांनीही करावी अशी सूचना केली. येत्या काही दिवसांत ही प्रक्रिया सुरळीत होईल असे त्यांनी सांगितले.