दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे सोलापूर महामार्गावर रावणगाव पोलिसांनी बेकायदा गुटखा वाहतूक करणाऱ्यांना पाठलाग करून खडकीच्या हद्दीत पकडले. पोलिसांनी पिकअप वाहनासह १८ लाख ८८ हजारांचा गुटख्याचा मुद्देमाल जप्त केला. अशी माहिती दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.
नामदेव मधकुर लवटे (वय २७ रा. निजामपुर, कोकरे मळा ता. सांगोला जि. सोलापुर) व दत्तात्रय पांडुरंग खांडेकर (रा. खैराय, सिध्दोबा मंदीरा जवळ ता. जत जि. सांगली) असे या वाहनचालकाचे व त्याच्या साथीदाराचे नाव असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी ( दि.२१) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास रावणगाव पोलीस चौकीचे पोलीस हवालदार बी. आर. बंडगर, पोलीस नाईक गोरख मलगुंडे, एन. एस. भागवत, एस. टी. डाळ व कुरकुंभ पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार एस. एम. शिंदे, पोलीस नाईक एम. एम. पवार हे पुणे – सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर रात्रीची पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जात असलेल्या एक महिंद्रा पिकअप गाडीचा त्यांना संशय आला.
संशय आल्याने त्या वाहनास थांबण्याचा इशारा केला, मात्र पोलीस दिसताच वाहनचालकाने पिकअप ( क्रमांक एम. एच. १२ क्यु.जी.१०४३ ) भरधाव वेगाने न थांबवता पुढे नेला. मग पोलीसांना संशय आल्याने खाजगी गाडीने पाठलाग करुन त्यास खडकी गावच्या हदीत हॉटेल आकांक्षा समोर थांबवले व दोघांना पकडले. वाहनामध्ये काय आहे? असे विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तपासणी केली असता गाडीत पाठीमागील हौदयामध्ये गोण्या दिसून आल्या.
गोण्याची पाहणी केली असता त्यामध्ये सहा गोण्यांमध्ये विमल गुटखा (पान मसाला), २२ गोण्या मध्ये छोटा विमल गुटखा (पान मसाला), ६ गोण्यामध्ये तंबाखू असल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी या दोघांना ताब्यात घेत महिंद्रा बोलेरो पिकअप सह १८ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. रावणगाव पोलीस चौकीचे पोलीस नाईक गोरख मलगुंडे यांनी फिर्याद दिल्याने त्या दोघांवर दौंड पोलीस स्टेशनला बेकायदा गुटखा साठवणूक व वाहतूक केल्याप्रकरणी अन्नसुरक्षा व अन्न व औषध प्रशासन व अन्नपदार्थ बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बी.आर.बंडगर हे करीत आहेत.