संपादकीय – राजेंद्र झेंडे
पिढ्यानपिढ्या खितपत पडलेल्या अज्ञात अशिक्षित बहुजन समाजाला शिक्षणाचे दरवाजे खुले झाले.. सातारा जिल्ह्यातील एका ग्रामीण भागात रयत शिक्षण संस्थेचा एक छोटाशा वटवृक्ष लावला. अन स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात, घराघरात शिक्षणाचा वटवृक्ष निर्माण केला. त्या आधुनिक भारताचे महान समाजसुधारक, कमवा व शिका हा नारा देणारे शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज २२ सप्टेंबर हा जन्मदिवस. या निमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक जीवन संघर्षाचा हा आढावा…!
भाऊरावांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावी झाला. १९ वे शतक म्हणजे अनेक समाज सुधारकांचा संघर्षाचा काळ होय. त्यापैकी एक नाव म्हणजे भाऊराव पाटील. तसं भाऊराव पाटील यांचे मूळ कर्नाटकमधील मुदबिद्री हे होय. परंतु भाऊरावांचे पूर्वज हे महाराष्ट्रात स्थलांतरीत झाल्यामुळे भाऊरावांचे संघर्षशील आयुष्य हे महाराष्ट्रातच गेले. वडील पायगोंडा व मातोश्री भंगूबाई. भाऊरावांना फक्त सहावी पर्यन्तच शिक्षण घेता आलं. परंतु सहावी पर्यंतचे शिक्षण घेऊनही भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. आज समाजापुढे शैक्षणिक आदर्श निर्माण करून भाऊराव पाटील हा एक ज्वलंत अभ्यासाचा विषय बनले आहेत.
छत्रपती शाहू महाराज, छत्रपती सयाजी महाराज गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील हे सर्व महात्मा फुलेंच्या विचाराने प्रेरित झालेले होते. छत्रपती शाहू महाराज, छत्रपती सयाजी महाराज गायकवाड यांनी शिक्षणा साठी अनेकांना आर्थिक मदत केलेली होती. त्यांच्याच विचारांचा आणि शैक्षणिक, सामाजिक कार्याचा वारसा पुढे भाऊराव पाटील यांनी पुढे नेला. भाऊराव पाटील यांनी ज्ञानदेव घोलप नावाच्या अस्पृश्य विद्यार्थ्यास शिक्षणासाठी आर्थिक मदत केली होती. पुढे तोच विध्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुकनायक या वृत्तपत्रासाठी काम करू लागला.
कर्मवीर भाऊरावांच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक प्रसंग घडला होता की, भाऊराव पाटील विद्यार्थीदशेत वसतीगृहात राहत असताना एका अस्पृश्यांसाठीच्या वस्तीगृहाच्या उदघाटनासाठी गेले होते. उदघाटन करून परत आल्यावर त्यांच्या वसतीगृहाच्या व्यवस्थापकाने त्यांना अंघोळ करण्यास सांगितले, परंतु भाऊरावांनी व्यवस्थापकाचा आदेश पाळला नाही. आदेशाचे पालन न केल्यामुळे भाऊरावांना वसतीगृहामधून काढण्यात आले.
वसतीगृहातून काढल्यामुळे भाऊरावांनी छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली. नंतर शाहू महाराजांनी भाऊरावांना विद्यार्थी कक्षातच राहण्याची सोय केली. यावरून भाऊराव हे अस्पृश्यतेच्या विरोधात होते हे लक्षात येते.
विद्यार्थीदशेत असताना विद्यार्थ्यांच्या समस्या काय असतात हे भाऊरावांनी जाणले होते, म्हणून शिक्षण सोडल्यानंतर भाऊरावांनी १९०९ रोजी विदयार्थ्यांसाठी एक आश्रम सुरु केला.
ज्याला दूधगाव विद्यार्थी आश्रम म्हणून ओळखले जाते. अस्पृश्यतेचा विचार न करता भाऊरावांनी महार – मातंग अशा सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आश्रम सुरु केले. भाऊरावांचे शैक्षणिक परिवर्तनाचे काम पुढेही चालूच राहिले. सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील कार्ले या ठिकाणी सत्यशोधक समाजाची परिषद भरली होती. या परिषदेत भाऊराव पाटील यांनीही सहभाग घेतला होता.
या परिषदेत बोलताना भाऊराव पाटील यांनी ग्रामीण जनतेच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था स्थापण्याची सूचना केली होती व त्यात गोरगरीब, पिडीतस, वंचित, अस्पृश्य व बहुजन समाजातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी शिक्षण देण्याचा विचार मांडला. याच विचारातुन पुढे ४ ऑक्टोबर १९१९ रोजी कार्ले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना भाऊराव पाटील यांनी केली. जी आजही कार्यरत आहे.
अस्पृश्यता निवारण करत असताना १९२४ मध्ये भाऊराव पाटील यांनी एक वसतीगृह स्थापन केले होते, त्या वसतीगृहामध्ये मोहिते आडनाव असलेल्या अस्पृश्य व्यक्तीला ठेवून अस्पृश्यतेच्या विरोधात एक प्रकारे त्यांनी सामाजिक जातीअंताची चळवळच उभी केली होती. कालांतराने त्याच वसतीगृहाचे नाव श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असे केले होते. यावरून छत्रपती शाहू महाराजांप्रती असलेला त्यांचा आदर दिसून येतो. याच शाहू बोर्डिंगला छत्रपती सयाजी महाराज गायकवाड यांनी भेट देऊन आर्थिक मदत केली होती.
आर्थिक परिस्थितीमुळे बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य होत नव्हते. उपजीविका भागवण्यासाठी शिक्षणापेक्षा काम करणे भाग पडत असल्यामुळे भाऊराव पाटलांनी बहुजनांच्या विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका हा क्रांतिकारक नारा देऊन शिक्षणासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. यावरून बहुजनांसाठी शिक्षण किती महत्वाचे आहे हे भाऊराव पाटील यांनी ओळखले होते. भाऊराव पाटलांनी साताऱ्यामध्ये महात्मा फुले अध्यापक विद्यालय नावाने देखील एक कॉलेज सुरु केले होते.
यावरून महात्मा फुलेंबद्दल भाऊरावांना किती आदर होता हे लक्षात येते. भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्य महाराष्ट्राच्या गावागावात पोहोचले होते. त्यांच्या कामाची माहिती मिळाल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार संत गाडगेबाबा यांनी भाऊराव पाटील यांची भेट घेतली. बहुजन समाजासाठी त्यांना शिक्षण मिळावे यासाठी हे तीन महापुरुष एकत्र आले. रयत शिक्षण संस्थेचे अनुदान व आर्थिक मदत तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री यांनी बंद केली. ही बातमी गाडगेबाबाना समजली ते भाऊराव पाटील यांनी भेटले आणि भीक गोळा करून जमा झालेली रक्कम भाऊराव यांना दिली.
तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, भाऊराव मी काय शिकलो नाय, पण तुम्ही शिकला. बहुजन समाजाला शिकवता. चांगले काम करता. मला हे जर आधीच समजले असते तर मी धर्म शाळा व आश्रम शाळा काढल्या नसत्या.पुढे गाडगेबाबांनी ही भाऊराव पाटील यांचा वारसा पुढे चालवत बहुजन समाजाला शिक्षण घेण्यासाठी शाळा काढल्या. भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष हा मोठा झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे सोने या संस्थेने केले आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सारखा शिक्षणाचा महत्त्व जाणारा शिक्षण महर्षी आज नाही, खाजगी शैक्षणिक संस्था काढून शैक्षणिक बाजार सुरू करणारे शिक्षणसम्राट सध्या खूप झाले आहेत. यांच्यामुळेच आज शिक्षण महाग झाले आहे. गोरगरीब वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही. पुन्हा बहुजन समाजाला शैक्षणिक अधिकार नकारण्याचे षडयंत्र रचले जात आहे. या शैक्षणिक सम्राटांनी व राजकारण्यांनी आज कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे…!