सलमान मुल्ला, जिल्हा प्रतिनिधी उस्मानाबाद
उस्मानाबाद : अति राग आणि भीक माग अशी आपल्याकडे जुनी म्हण आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे कुत्र्याने मटण खाल्ले म्हणून रागारागाने बापाने थेट मुलीवरच गोळी झाडून तिचा जीव घेतला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मुळात एका कुत्र्याने खाल्लेल्या मटणापायी चक्क पोरीचा बळी घेण्यापर्यंत बापाची मजल जाते, अशा रागाला काय म्हणावे असा प्रश्न पडणारी ही बातमी आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे ही घटना घडली. काजल मनोज शिंदे ही विवाहित मुलगी तिच्या माहेरीच रहात होती.
काजलचा वडील गणेश भोसले याने घरी मटण आणले होते. काजलच्या आईने मिराबाईने घरात मटण बनविले, परंतु काजलचे काही कारणास्तव दुर्लक्ष झाल्यामुळे हे मटण कुत्र्याने खाल्ले.
कुत्र्याने मटण खाताच काजल आणि तिच्या आईमध्ये भांडण सुरू झालं. हे भांडण सुरु असतानाच गणेश भोसले हा घरात आला. त्याने मद्यप्राशन केले होते. मटण कुत्र्याने खाल्ले हे ऐकताच त्याची तळपायाची आग मस्तकाला भिडली आणि त्याने नशेत समोर आपली मुलगी आहे, हे माहिती असूनही थेट आपल्या मुलीवरच गोळी झाडली. या गोळीबारात मुलगी गंभीर जखमी झाली.
मुलीच्या छातीवरच गोळी झाडल्याने तिची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. हा प्रकार समजल्यानंतर मयत काजलचे नातेवाईक विशाल जयराम भोसले यांनी तिला तुळजापुर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी जात असताना काजलचा मृत्यू झाला. दुसरीकडे या घटनेनंतरही या घटनेची माहिती विचारणाऱ्या काजलचा पती मनोज शिंदे याला गणेश व मिराबाई भोसले या दोघांनी ठार मारण्याची धमकी दिली.
त्यावरून मनोज सुनिल शिंदे यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून गणेश व मिराबाई या दोघांना अटक केली. दरम्यान या घटनास्थळी तुळजापूर उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटील, नळदुर्गचे सहायक निरीक्षक सिध्देश्वर गोरे यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास श्री. गोरे करीत आहेत.