दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील मळद तलाव परिसर तसेच मळद – रावणगाव च्या शिवेजवळ मागील काही दिवसांपासून पासून बेकायदा वाळू उत्खनन जोरात सुरू आहे, दौंड तहसीलदार संजय पाटील यांनी या प्रकाराकडे लक्ष घालून संबंधित वाळू उपसा बंद करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
पुणे – सोलापूर महामार्गावरील मळद तलाव परिसर तसेच कुरकुंभ , जिरेगाव हद्दीत बेकायदा वाळू उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार संजय पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी संबंधित वाळू उत्खनन करणाऱ्या व्यक्तींच्या मालमत्तेवर बोजा दाखल करून दंडात्मक कारवाई केली होती.
आता पुन्हा मागील दीड महिन्यांपासून मळद व रावणगावच्या शिवेजवळ सार्वजनिक ओढ्यालगत तसेच मळद तलाव परिसरात स्थानिक वाळू माफिया सक्रिय झाले आहेत. रात्रीच्या वेळी जेसीबी मशीनच्या सहाय्याने बेकायदा उत्खनन करून माती मिश्रित वाळू उपसा व वाहतूक सुरू आहे.
वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून रात्रीच्या सुमारास शेतकऱ्यांच्या अंतर्गत रस्ते व शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. संबंधित वाळू उपसा करणाऱ्या व्यक्ती महसूल शाखेच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित असल्याचे समजते. त्यामुळे स्थानिक महसूल विभागाचे कर्मचारी हे या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा या भागात आहे.
याबाबत तहसीलदार संजय पाटील यांनी लक्ष घालून याठिकाणी सुरू असलेला वाळू उपसा तातडीने बंद करून संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.