पुणे महान्यूज लाईव्ह
पुण्यातील मंगळवार पेठेतील बालाजी हाईटस मध्ये सहकार विभागात लेखाधिकारी असलेल्या गणेश शंकर शिंदे या ५२ वर्षीय सरकारी अधिकाऱ्याने आत्महत्या केली. ती आत्महत्या खासगी सावकारांच्या जाचातून केली ही एक कथा.. आणि दुसरी म्हणजे त्या सावकाराकडून कशासाठी पैसे घेतले माहितेय? बदलीसाठी! सरकारच्या भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीला टांगण्यासाठी ही आत्महत्येची कहाणी पुरेशी आहे.
मंत्रालयात बदलीसाठी पैसे द्यावे लागतात.. किती द्यावे लागतात.? आता कोणी लाखात बोलतच नाही.. आता कोटीमध्ये बोलतात.. मग ज्या खुर्चीवर बसायचे, तिथे किती लुटतात, याकडे कोणीच पाहायचं नाही. गणेश शिंदे या लुटालुटीच्या व्यवस्थेतले बळी आहेत. असे अनेक आहेत, काहीजण मरत नाहीत, मात्र लुटालुट वेगाने करून त्या पैशाची वसुली करून टाकतात.. गणेश शिंदे त्या पठडीतले नसावेत.. म्हणूनच खासगी सावकारीचे शिकार झाले..अथवा त्यांना यामध्ये कोणीतरी ओढले असावे असाच कयास आता बांधला जात आहे.
गणेश शिंदे यांनी मुंबईतून पुण्यात बदली मागितली होती. त्यासाठी वरीष्ठ अधिकाऱ्याने त्यांच्याकडून पैशाची मागणी केली होती. त्याची जुळवाजुळव करण्यासाठी खासगी सावकाराकडून ३० टक्के व्याजदराने ८४ लाख ५० हजार रुपये शिंदे यांनी घेतले. खासगी सावकाराकडून घेतलेले पैसे वेळेवर परतफेड होत नव्हती. त्यामुळे आर्थिक व मानसिक छळाला सुरवात झाली.
या छळाला कंटाळून अखेर शिंदे यांना आत्महत्या करावी लागली. तत्पूर्वी शिंदे यांनी आत्महत्या करण्याची कारणे नमूद करणारी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. फरासखाना पोलिसांनी या प्रकरणात शंकर गायकवाड, विजय सोनी, त्याचा वडील, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे, मनीष हजारा व इतर यांच्याविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ज्या अधिकाऱ्याने पैसे मागितले, त्यावर कारवाई होणार का?
अर्थात बदल्यांचे दृष्टचक्र मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यापर्यंत असते असे सांगितले जाते. कोणत्याही प्रथम श्रेणी अधिकाऱ्याची बदली आता कोटीच्या घरात पैसे मोजल्या शिवाय होतच नाही. ही उघड उघड असलेले गुपित आहे. अर्थात यामध्ये एखाद्या मंत्र्याचा स्वीय सहायक असतो, दलाल असतात..काही ठिकाणी अधिकारीही असतात हे आता लपून राहीलेले नाही. मग या गणेश शिंदेसाठी बदल्यांच्या भ्रष्टाचाराचे दृष्टचक्र शोधून काढण्याचा श्रीगणेशा होणार का? हा ही प्रश्न अनुत्तरीतच आहे.
कदाचित खासगी सावकारांवर गळ मारून त्या्ंच्यावरच गुन्हे दाखल करून हे प्रकपरण संपवले गेले, तर खरे मुकुटमणी बाजूलाच राहतील. पोलिस कदाचित अशा वरिष्ठ यंत्रणेपर्यंत पोचतीलही, मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवतील का?
😠😡😩😭