विक्रम वरे ::महान्यूज लाईव्ह
बारामती शहर पोलीस दलात ज्यांचं नाव आदराने घेतले जात होते, त्या महिला पोलीस कर्मचारी शितल जगताप- गलांडे यांचा आज डेंगीने बळी घेतला. बारामतीचा या हंगामातील डेंगीचा हा पहिला बळी होता. मात्र दहा दिवसांपूर्वीच शितल यांनी बाळाला जन्म दिला होता, त्यामुळे त्यांच्या जाण्याने फक्त पणदरेच नव्हे, तर बारामती, इंदापूरसह संपूर्ण पुणे जिल्हा हळहळला.
शितल जगताप यांच्यावर गेली काही दिवस पुणे शहरातील केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना डेंगीची लागण झाली होती. दहा दिवसापूर्वीच त्यांची प्रसूती झाली होती. बारामती शहर व ग्रामीण भागात डेंग्यूची मोठ्या प्रमाणात साथ असून शहर व ग्रामीण भागातील दवाखाने फुल्ल झाले आहेत. त्यांच्या निधनानं अवघ्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेले बाळ आईची माया कळण्यापूर्वीच पोरकं झाले.
शीतल या बारामती शहर पोलीस ठाण्यात संगणकीय प्रणालीचे कामकाज पाहत होत्या. त्यांचे माहेर इंदापूर तर सासर बारामती तालुक्यातील पणदरे हे होते. त्या अगदी प्रसूतीच्या काळापर्यंत ठाण्यातील काम पाहत होत्या. प्रसूतीनंतर त्यांना डेंगीची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर, त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली. प्रसूती रजेवर होत्या.
त्यांच्यावर आज पणदरे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी उपस्थित जनसागर या घटनेने हेलावून गेला होता. अवघ्या दहा दिवसाच्या बाळाला आईची माया कळण्यापूर्वीच आईचे छत्र निघून गेल्याने त्या विषयाची हळहळ तर व्यक्त केली जात होतीच, परंतु संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पोलीस दल देखील हळहळले.