सलमान मुल्ला : महान्यूज लाईव्ह
उस्मानाबाद : येथे आज सकल मराठा समाज आयोजित मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. ओबीसी कोट्यातून न्याय्य आरक्षण द्यावे या मागणीसाठी साधारण एक लाख मराठा बांधव, भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
या मोर्चात जिल्ह्यातील सर्वच भागातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सकाळपासून दाखल होत झाले होते. कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात घोषणा न देता केवळ आरक्षण समर्थनाच्या तसेच ‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणा दिल्या गेल्या.
या मोर्चात सर्व पक्षीय मराठा समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवती, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या होत्या यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपअधीक्षक नवनीत कॉमत,कळंबचे पोलीस उपअधीक्षक एम.रमेश व सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी जागोजागी मोठा पोलिस बंदोबस्त होता. मोर्चातील नागरिकांसाठी मुस्लिम बांधवांच्या वतीने ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची, अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.
शेवटी कळंब येथील उपविभागीय कार्यकारी अधिकारी यांना महिलांच्या वतीने निवेदन देऊन या कार्यक्रमाची सांगता झाली. कळंब शहरातून निघालेल्या भव्य आरक्षण महामोर्चाला कळंब शहरातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी करण्यात आली व सामाजिक एकजुटीचा संदेश देण्यात आला.
हा मोर्चा विद्याभवन हायस्कूल येथून सुरुवात होऊन राजमाता जिजाऊ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, होळकर चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालउद्यान येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून नगरपरिषद शाळा क्रमांक एक येथे पोहोचला. नंतर पाऊस सुरू झाला, परंतु भर पावसात देखील समाजबांधव आपल्या जागेवर बसून होते.
या महामोर्चास कळंब तालुक्यातूनच नव्हे तर उस्मानाबाद जिल्ह्यातून सर्व खेडेगावातून लहान मुले, महिला, जेष्ठ नागरिक सहभागी होते. या मोर्चात अंदाजे एक लाखाहून अधिक लोक उपस्थित होते.