सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
केंद्रीय मंत्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा अखेर निश्चित झाला असून, आत्तापर्यंत साधारणतः असा असणारा दौरा आता खात्रीशीर निश्चित झाला आहे. येत्या 22, 23 व 24 सप्टेंबर दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांमध्ये निर्मला सीतारामन भेट देऊन विविध घटकांशी संवाद साधणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी 22 सप्टेंबर रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या खडकवासला विधानसभेचा व भोर आणि पुरंदर तालुक्याचा दौरा करतील. यामध्ये त्या 22 सप्टेंबर रोजी सकाळी लोकसभेच्या कोअर समितीची वारजे येथील अविस्मरण हॉल येथे बैठक घेणार आहेत.
त्यानंतर धायरी येथील मुक्ताई गार्डनमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ते संबंधित करतील. याच दिवशी दुपारी बारा वाजता धनकवडी येथे जनसंघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी चर्चा करून या मतदारसंघातील आवश्यक त्या व्यूहरचनेविषयी चर्चा करतील. दुपारी दीड वाजता बावधन येथे भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्या संवाद साधणार आहेत.
याच दिवशी दुपारी चार वाजता भोर तालुक्यातील वरवे बुद्रुक येथे केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची त्या संवाद साधणार असून, संध्याकाळी सात वाजता पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला भेट देणार आहेत. याच दिवशी संध्याकाळी पावणेआठ वाजता त्या सासवड येथे हर घर जनसंपर्क मोहीम या मोहिमेत सहभागी होणार आहेत.
शुक्रवारी 23 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता त्यांचा दौरा सुरू होईल. जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेऊन त्या जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांची संवाद साधणार आहेत. सकाळी दहा वाजता जेजुरी येथेच पुरंदर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असून, दुपारी बारा वाजता मोरगाव येथे शासकीय अधिकाऱ्यांसमवेत त्या आढावा बैठक घेणार आहेत.
या दिवशी दुपारी बारामती शहरात त्यांचे आगमन होईल. दुपारी एक वाजता बारामतीतील भाजप कार्यालयाला भेट व दुपारी साडेतीन वाजता मुक्ताई लॉन्स येथे सामाजिक कार्यकर्ते, सहकारी संस्थांचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांशी त्या संवाद साधणार आहेत. यावेळी केंद्र सरकारच्या अर्थखात्याशी संबंधित विविध योजना व विविध विषयावर त्या संवाद साधतील.
संध्याकाळी पाच वाजता त्या इंदापूर तालुक्यातील जंक्शन, अंथुर्णे आणि निमगाव केतकी या गावांना भेट देणारा असून, रात्री आठ वाजता झगडेवाडी येथील दुर्बल घटकातील प्रतिनिधींशी आयोजित करण्यात आलेल्या संवादामध्ये भाग घेतील.
यानंतर शनिवारी 24 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता इंदापूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या युवक व नव मतदाराच्या संवाद कार्यक्रमात त्या मार्गदर्शन करणार असून, सकाळी 11 वाजता दौंड विधानसभा मतदारसंघातील खडकी येथे भाजपच्या युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांसमवेत तसेच आयटी व सोशल मीडिया या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होईल.
दुपारी साडेबारा वाजता पाटस येथे शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक आणि केंद्राच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांची पाहणी त्या करतील. दुपारी एक वाजता बोरीपार्धी येथील बोरमलनाथ मंदिरात मतदारांशी संवाद साधल्यानंतर सव्वा दोन वाजता राहू येथे महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची संवाद साधून पुण्याकडे रवाना होतील.