बारामती : महान्यूज लाईव्ह
येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील संयुक्त जयंती समितीच्या वतीने कर्मवीर अण्णांचे द्रष्टेपण व नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर सेवकांसाठी कर्मवीर भाऊराव पाटील वक्तृत्व स्पर्धा झाली.
प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांच्या या वक्तृत्व स्पर्धेत डॉ. हणमंतराव पाटील ( विद्या प्रतिष्ठानचे , कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय )यांनी प्रथम, रेश्मा नरहरी काळे ( विद्या प्रतिष्ठानची सायरस पुनावाला शाळा ) यांनी द्वितीय ,तर सोनल सूर्यकांत ब्राह्मणकर ( तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय ) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
डॉ. श्रीराम गडकर , डॉ.हनुमंत फाटक व डॉ. सुनील ओगले यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले . विजेत्या स्पर्धकांना कर्मवीर जयंतीच्या दिवशी जाहीर कार्यक्रमात आर.एन आगरवाल टेक्निकल हायस्कूल बारामती येथे सन्मानपूर्वक बक्षिसे व प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहेत .
विद्या प्रतिष्ठान संस्थेचे सदस्य मा.किरण गुजर यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले. आपल्या उद्घाटनपर भाषणात ते म्हणाले की, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षणातील दीपस्तंभ होते . शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले प्रयोग अनन्यसाधारण होते.
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात कर्मवीरांच्या ध्येयधोरणांचा अंतर्भाव झालेला दिसतो. स्वावलंबी शिक्षणातून समाजात जीवनमूल्ये रुजवायची असतील तर कर्मवीरांच्या विचारांचा जागर होणे आवश्यक आहे. आधुनिक शिक्षण पद्धतीत आमुलाग्र परिवर्तन घडवून आणायचे असेल तर कर्मवीरांच्या विचारांशिवाय पर्याय नाही.
कारण महात्मा गांधी , महात्मा फुले व राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा पगडा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर होता असे प्रतिपादन या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विद्या प्रतिष्ठानचे सदस्य किरण गुजर यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी संयुक्त कर्मवीर जयंती समितीचे कार्यवाह प्रा. राजेंद्र आगवणे, मराठी विभागाचे प्रमुख डॉ. आनंदा गांगुर्डे , डॉ.श्रीराम गडकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कर्मवीर अण्णांचे द्रष्टेपण आणि नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर प्राध्यापकांची वक्तृत्व स्पर्धा होणे हे कौतुकास्पद आहेच, पण या विषयावर चर्चासत्र झाले असते, तर त्यातील निष्कर्ष हे आजच्या शिक्षण व्यवस्थेला दिशा देण्यास नक्की उपयोगी ठरले असते असा आशावादही गुजर यांनी व्यक्त केला.
मराठी विभाग प्रमुख डॉ.आनंदा गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. श्रीराम गडकर यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. प्रा. सुनील डिसले यांनी उपस्थितांचे आभार मानले तर प्रा. शिवाजी टकले यांनी सूत्रसंचालन केले.