सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
औरंगाबादच्या कन्नडचे आमदार प्रशांत बंब यांनी गुरूजींविरोधात घेतलेल्या भूमिकेवरून राज्यभरात मास्तरांमध्ये संतापाची भावना आहे. दुसरीकडे बंब यांना सामान्य पालकांचे मात्र मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत आहे, अशा परिस्थितीतच काल इंदापूरात शिक्षकांच्या पतसंस्थेच्या वार्षिक सभेत माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी शिक्षकांना समर्थन देत आता मुख्यालयी राहण्याचे ते दिवस गेले, या निर्णयात वेळप्रसंगी शासन स्तरावर प्रयत्न करू अशा शब्दांत शिक्षकांना समर्थन केल्याने मास्तरांना दहा हत्तीचे बळ आले आहे.
अर्थात भरणे यांचे वक्तव्य फक्त कार्यक्रमापुरते सवंग लोकप्रियतेसाठी न राहता, तेवढ्या आक्रमकपणेच पुढेही कायम राहणार का? आणि येत्या काळात खरोखरच आक्रमक भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात मवाळ दत्तात्रेय भरणे यांची भूमिका कशी राहणार? आणि मास्तरांच्या हितासाठी राष्ट्रवादी विरूध्द भाजप अशी लढाई रंगणार का? याची उत्सुकता आहे.
इंदापूरात शिक्षकांसमोर बोलताना दत्तात्रेय भरणे यांनी राणा भिमदेवी थाटात आता ते दिवस गेले, अशा शब्दांत रमेश बंब यांना उघडपणे आव्हान दिले आहे. तसेही गुरूजींना राजकारणातील बरेच काही कळते, त्यामुळे आपल्या लोकहिताचा नांगर ते भरणे यांच्या खांद्यावर देऊन ही लढाई काठावरून पाहतील काय?आणि भरणेदेखील बोलले तसेच करून दाखवतील काय? हेही येत्या काळात दिसेल.
अर्थात राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये गुरूजींनी रस्त्यांवर उतरून निषेधाचा बंब पेटवला, तरीही बंबांच्या भूमिकेत तसूभरही फऱक पडलेला नाही. भाजपनेही त्यांना कोणतीही तंबी दिलेली नाही. कारण बंबांनी जे बोलून दाखवले, तेच राज्यातील लाखो पालकांच्या पोटात होते. फक्त प्रशांत बंबांच्या ओठावर आले एवढेच. त्यामुळे आपल्याला मिळणारे समर्थन पाहून व त्याचे सर्वेक्षण केल्यानंतर राज्यभरात पालकांचा पाठिंबा दिसल्याने भाजपनेही यात मौनच बाळगले आहे.
अशा स्थितीत गुरूजींच्या बाजूने उतरणाऱ्या भरणे यांना शिक्षक आमदारांनंतर गुरूजी डोक्यावर घेतील अशीच चिन्ह आहेत. अर्थात भरणे यांनी हा मुद्दा राज्यव्यापी केला तरच, अन्यथा इंदापूरमधील भाषणे बऱ्याचदा स्थानिकच होऊन जातात हा गेल्या पंचवीस वर्षांपासूनचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळेच शिक्षकांच्या मुख्यालयाचा जुना शासन निर्णय बदलण्यासाठी भरणे जीवतोड मेहनत घेतील का याकडे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे. त्याचबरोबर राज्यात भाजप व राष्ट्रवादीच्या वादात आणखी एका बी विरूध्द बिग बी म्हणजेच बंब विरूध्द भरणे अशा लढाईची देखील उत्सुकता आहे.