पेन्शन नसणाऱ्या शिक्षकाचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 31 लाख रुपयांची मदत करणारी इंदापूर प्राथमिक शिक्षक पतसंस्था राज्यातील एकमेव संस्था ठरणार..!!
— मागील संचालक मंडळाने केलेल्या आर्थिक उधळपट्टीची चौकशी लावणार..!! सत्ताधारी संचालक मंडळाचा निर्णय
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर -प्राथमिक शिक्षक मुख्यालयी रहावे असा शासननिर्णय आहे.हा शासन निर्णयाच्या मुद्द्यावर राजकीय व इतर क्षेत्रातील मंडळी विनाकारण शिक्षकांना वेठीस धरत आहेत, हे चुकीचे आहे असे सांगत आता काळानुसार दळणवळणाची साधने उपलब्ध झाल्याने शिक्षकांना मुख्यालय राहण्यासाठीचा शासन निर्णय रद्द करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही माजी राज्यमंत्री, आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची 99 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी गुणीजनांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भरणे बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर होते.
यावेळी बोलताना आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, प्राथमिक शिक्षक जिथे नोकरी करत आहेत त्या मुख्यालयाच्या ठिकाणीच राहण्याचा शासनाचा निर्णय आहे. हा निर्णय फार जुना आहे. ज्या काळात दळणवळणाची सुविधा उपलब्ध नव्हती. त्या काळात शिक्षकांनी मुख्यालयी रहावे अशी शासनाची धारणा होती.परंतू बदलत्या काळानुसार यामध्ये शिथिलता येत गेली.दळवळणाचे सर्व साधन उपलब्ध झाले असल्याने मुख्यालयी राहिल्यावरच गुणवत्ता सुधारते हा मुद्दा कालबाह्य झालेला आहे. विनाकारण शिक्षकांना वेठीस धरण्यासाठी हा शासननिर्णयाचा वापर काही राजकीय आणि इतर क्षेत्रातील मंडळी करतात.हे चुकीचे असल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले.
भरणे म्हणाले की, शिक्षकांनी सर्वांना घडविण्याचे काम केले आहे. ज्ञानदान संस्कार देण्याचे काम शिक्षक हे प्रामाणिकपणे करत असतात. बदलते युगात कुणीतरी अशा मागण्या करीत असतात, त्याकडे दुर्लक्ष करावे.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आपल्या भाषणात शिक्षक हा उद्याची पिढी घडवत असतो.भविष्यकाळातील अनेक पिढ्या घडवण्यामध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो असे त्यांनी सांगितले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत शिक्षकांना आणि शिक्षक सोसायटींना पूर्वी शिक्षकांना १०% दराने तर सोसायटीना १०.५ % दराने कॅशक्रेडीट मंजूर होत होते.संबधीत व्याजदरात आणखी कपात करण्यासाठी विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार आणि पी.डी.सी.सी चे अध्यक्ष यांना विनंती करणार असल्याचेही आमदार भरणे यांनी सांगितले.
दरम्यान जिल्हा आदर्श शिक्षक ,शिष्यवृत्ती गुणवत्ता धारक ,नवोदय पात्र, सैनिक स्कूल पात्र , दहावी ९०% बारावी ८५% च्या पुढील , नीट आणि जेईई मध्ये उज्वल यश प्राप्त केलेले प्राथमिक शिक्षकांची मुले , संस्थांचे राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक , सेवानिवृत्त शिक्षक यांचा सत्कार करून गुणगौरव करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर ,पतसंस्थेचे सभापती आदिनाथ धायगुडे, उपसभापती रामचंद्र शिंदे, सचिव प्रशांत भिसे, संचालक बालाजी कलवले, सुहास मोरे, दत्तात्रय चव्हाण, सतीश गावडे , अनिल शिंदे, सतीश दराडे, भारत बांडे, किशोर वाघ, संजय मस्के, भाऊसाहेब वनवे, शशिकांत शेंडे, प्रशांत घुले, सचिन देवडे, संतोष कुमार तरंगे, सदाशिव रणदिवे, संतोष गदादे, संगीता पांढरे, संजीवनी गरगडे, मधुकर भोंग, सुप्रिया आगवणे, दत्तात्रय तोरसकर, नानासाहेब नरूटे, सहदेव शिंदे, सतीश शिंदे, अनिल रुपनवर, नानासाहेब दराडे यांच्यासह आजी माजी संचालक शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिव प्रशांत भिसे यांनी सभेपुढे वाचन करुन आवाजी मतदानाने विषय पारित केले. यामध्ये शिक्षक कल्याण निधीचा लाभ पेन्शनधारक शिक्षक मृत्त पावलेस त्याच्या कुटुंबीयास २० लाख रुपये तर डीसीपीएस धारक शिक्षक मृत पावलेस त्याच्या कुटुंबीयास 31 लाख रुपये मिळणार. कर्ज मर्यादा 30 लाख रुपये.तातडीचे कर्ज 75 हजार रुपये, यासह इतर विषय पारित केले. त्याचप्रमाणे मागील संचालक मंडळाने केलेल्या आर्थिक उधळपट्टीची चौकशी लावणार.कर्जाचा आणि ठेवीचा व्याजदर नऊ टक्के ठेवणार असल्याचेही स्पष्ट केले. दरम्यान शिक्षक पतसंस्थेच्या सत्ताधारी संचालकांनी आमदार दत्तात्रय भरणे यांची वाजत गाजत घोड्यावरून मिरवणूक काढली.