बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामती शहरात दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे, ब्लॅकमेलिंग करणे व शरीरसंबंध ठेवण्याच्या प्रकरणात बारामती पोलिसांनी अटक केली. तर एका होमगार्डलाही महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली आहे.
बाामतीतील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार बारामती शहर पोलिसांकडे दाखल होती. मात्र संशयिताचा ठावठिकाणा तांत्रिक बाबींच्या आधारेही मिळत नव्हता. मात्र पोलिसांनी वेगवेगळी तपास पथके तैनात करून व खबऱ्यांच्या मदतीने आदित्य धनाजी गायकवाड (वय 20 वर्षे, रा. पानसरे अपार्टमेंट कृष्णाई लॉन्स, तांदूळवाडी) याला पुण्यातून ताब्यात घेतले व अटक केली. त्याने 14 डिसेंबर 21 रोजी बारामतीतीलच एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेले होते. त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बारामती पोलिस करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत 23 ऑगस्ट पासून स्वतःच्या नात्यातील अल्पवयीन मुलीवर तिला ब्लॅकमेल करून तिच्याबरोबर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्यावरून क्षितिज उर्फ ऋतिक सुनील गरड (वय 22 वर्षे, रा. जेऊर ता. करमाळा, सध्या रा. रुई पाटी, बारामती) याला पोलिसांनी अटक केली. क्षितीज यास पोलिसांनी ठाणे शहरातून अटक केली. त्याच्यावरही बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसऱ्या घटनेत कुंपणच शेत खात होते. बारामतीत होमगार्ड म्हणून काम करणारा सुजित सुनील घाडगे (वय 26 वर्ष राहणार गौतम नगर बारामती) हा ओळखीचा गैरफायदा घेऊन एका महिलेस काही वर्षापासून मारहाण करत होता. दमदाटी करून तिच्या संमतीशिवाय तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. त्यामुळे त्याच्याविरोधात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली.
या तीनही गुन्ह्यांचा तपास व कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, मुकुंद पालवे, संध्याराणी देशमुख, पोलीस कर्मचारी अंकुश दळवी, देवेंद्र खाडे, अनिल सातपुते, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, दशरथ इंगोले यांनी केली.