सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
दुनियेला ज्ञान शिकवणारेच जर आकांडतांडव करीत असतील, शेंबड्या पोरासारखे वागत असतील तर? इंदापूरात तब्बल १०० वर्षे होत आलेल्या शिक्षकांच्या पतसंस्थेच्या वार्षिक सभेत आज शिक्षकांचे लाजिरवाणे वर्तन इंदापूर तालुक्यासह राज्यभरातील नेटकऱ्यांनी सोशल मिडीयावर पाहिले.
इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या प्राथमिक सहकारी पतसंस्थेची आज वार्षिक सर्वसाधारण सभा होती. नुकतेच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विचारांच्या पॅनेलचा पराभव होऊन माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या विचाराच्या पॅनेलचा विजय झाला होता. त्यांची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा आज इंदापूरात होती.
ही सभा मागील वर्षीच्या कामकाजावर असल्याने यापूर्वीच्या संचालक मंडळाच्या वार्षिक कामकाजावर होणार होती. त्यामुळे या सभेत वादंग होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. आमदार दत्तात्रेय भरणे यांचे आभाराचे भाषण झाल्यानंतर दुसऱ्या सत्राची सुरवात झाली. या वार्षिक सभेसाठी तालुक्यातून ७०० च्या वर शिक्षक उपस्थित होते.
या सभेत मागील कारभारावर चर्चा करण्याची इच्छा काही सभासदांनी व्यक्त करताच सभेत गोंधळ सुरू झाला अशी माहिती कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष सुहास मोरे यांनी दिली.
पतसंस्थेचे अध्यक्ष आदिनाथ धायगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिल्या सत्रात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. दुसऱ्या सत्रात प्रत्यक्ष सभेला सुरवात झाली.
काही सभासद शिक्षक काळ्या फिती लावून आले, त्यांनी माईक मागवला. दोन ते तीन मिनीटे माईक दिला नाही, आम्हाला सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा कारभार उघड़ करायचा आहे,मात्र आम्हाला बोलून दिले नाही व सत्ताधाऱ्यांनीच गोंधळाला सुरवात केली असा आरोप विरोधकांनी केला.
तर दुसरीकडे विरोधकांनी जी १६ वर्षे पतसंस्थेवर सत्तेची चव चाखली, त्यात केलेल्या अनेक गैरकारभार आम्हाला उघड करायचा होता, मात्र तो उघड होऊ नये म्हणूनच विरोधकांनी गोंधळ घातला असा आरोप सत्ताधारी संचालक मंडळाने केला.
दरम्यान या वादामागे पतसंस्थेच्या व्यापार संकुलाला अगोदर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव होते, ते आता राजर्षी फुले शाहू आंबेडकर व्यापारी संकुल असे नाव देण्याचीही किनार होती असे आता सांगितले जात आहे. दरम्यान काहीही असले तरी इंदापूरच्या आजच्या प्रकाराने गुरूजींच्या वर्तनाची बोंबाबोंब तालुक्यात सगळीकडे पोचायची ती पोचलीच..!