दौंड – महान्यूज लाईव्ह
दौंड तालु्क्यातील वेताळनगर येथील विद्युत रोहित्र बनविण्याच्या कंपनीतील सुरक्षारक्षकाचे हातपाय बांधून त्याच्या तोंडात बोळा कोंबून सहा चोरट्यांनी विद्युत रोहित्र बनविण्याचे ७६ हजारांचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली.
याप्रकरणी रोहित बाळासाहेब जगदाळे (लिंगाळी, ता. दौंड) यांनी दौंड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे, त्यावरून पोलिसांनी सहा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे,
यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रोहित जगदाळे यांची वेताळनगर येथे साई ट्रान्सफार्मर नावाची विद्युत रोहित्र बनविण्याची कंपनी आहे. वेताळनगर भागातील या कंपनीत दिवसा काम करणारा अक्षयकुमार दिनानाथ बीन (वय २१. रा. गोपालगंज, बिहार) हा कामगार तेथेच रात्रपाळीत सुरक्षेचे काम करतो.
रविवारी पहाटे दोनच्या सुमारास रोहित जगदाळे यांना दिवेकर यांनी फोन करून कंपनीत चोरी झाल्याची माहिती दिली. त्यावरून जगदाळे कंपनीत आल्यानंतर त्यांना अक्षयकुमार याने ही माहिती दिली.
रविवारी पहाटे एकच्या सुमारास अक्षय झोपेत असताना सहा जण कंपनीचे कुलूप तोडून कंपनीत आले. त्यांनी रुमालाने तोंड झाकले होते. अक्षय याने आरडाओरडा करू नये म्हणून हाय व पाय वायरने बांधले व तोंडात कापडाचा बोळा घातला व तांब्याची वायर, पितळाचे साहिच्य व अॅल्युमिनिअमच्या कांबा त्यांनी चोरून नेल्या. या घटनेचा पुढील तपास फौजदार चौरे करीत आहेत.