दिल्ली : महान्यूज लाईव्ह
वाहनप्रेमींसाठी आणखी एक खुषखबर.. सध्या महिंद्राची वाहने आकर्षक दिसत असल्याने एक्सयूव्ही ७०० वर ग्राहकांच्या उड्या पडत आहेत. आता नवीन Mahindra XUV 400 ही इलेक्ट्रिक SUV बाजारात येतेय. त्याची टेस्ट ड्राइव्ह डिसेंबर 2022 पासून सुरू होईल आणि जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यापासून महिन्द्रा डीलरशिप तसेच ऑनलाइन दोन्हीवर बुकिंग सुरू होईल.

महिंद्रा एक्सयूव्ही -४०० ही इलेक्ट्रीक गाडी जानेवारी २०२३ मध्ये ग्राहकांच्या हातात मिळेल. यामध्ये पुण्यासह देशातील पहिल्या १६ शहरांमध्ये ही गाडी पहिल्या टप्प्यात मिळेल. मुंबई, हैदराबाद, दिल्ली एनसीआर, बेंगळुरू, कोलकाता, चेन्नई, पुणे, अहमदाबाद, गोवा, जयपूर, सुरत, नागपूर, त्रिवेंद्रम, नाशिक, चंदीगड आणि कोची या शहरांमध्ये ही गाडी पहिल्यांदा ग्राहकांना भेटणार आहे.

सी सेगमेंटमध्ये सर्वात विस्तृत अशी ही कारची श्रेणी असल्याचा दावा महिंद्रा कंपनीने केला असून महिंद्रा महिंद्रा एक्सयूव्ही -४०० ही इलेक्ट्रीक कार ८.३ सेकंदात १६० किमीचा वेग पकडेल आणि एका चार्जिंगमध्ये तब्बल ४५६ किलोमीटर पोचेल. या गाडीचा सर्वोत्तम वेग १६० किलोमीटर प्रतितास असा आहे. ३९.४ किलोवॅटची बॅटरी या कारला असणार आहे.

सहा एअरबॅग, वॉटरफ्रूफ बॅटरी, विशेष कॉपर कन्सर्ट, १६ इंची अलाईड व्हिल्स, फ्रंट फॅशिअरसह नवीन हेडलाईट, सॅटिन कॉपर इन्सर्टसह इलेक्ट्रिक टेल लॅम्प, १७.७८ सेंमी टचस्क्रिन, अॅपल कारप्लेसाठी विशेष अॅप्लीकेशनसह फर्स्ट इन सेगमेंट, मोबाईल अॅप, स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी अशा विविध सुविधा यामध्ये असणार आहेत.