सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : तालुक्यातील कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेल्या इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची आज वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे, अशी माहिती शिक्षक पतसंस्थेचे सभापती आदिनाथ धायगुडे यांनी दिली.
ही वार्षिक सर्वसाधारण सभा सकाळी ११.४५ वाजता होत आहे.
या सभेसाठी इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित राहणार आहेत. भरणे यांच्या हस्ते गुणीजनांचा सन्मान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर असतील.
गेली अनेक वर्षे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाच्या ताब्यात ही शिक्षक पतसंस्था होती. मात्र गेल्या काही महिन्यापूर्वी शिक्षक पतसंस्थेवर आमदार दत्तात्रय भरणे यांच्या गटाच्या शिक्षकांनी झालेल्या निवडणुकीत बदल घडवून सर्व जागा जिंकत पतसंस्था आपल्या ताब्यात घेतली.
आज नवीन संचालकांची पहिलीच वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. विरोधकांचे निवडणुकीत पानिपत केल्यानंतर आज होणाऱ्या वार्षिक सभेमध्ये विरोधक काय मुद्दा उपस्थित करतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.