शिरूर : महान्यूज लाईव्ह
गुनाट(ता.शिरूर) येथे गुनाट- निर्वी रस्त्यावर दुधाचा टँकर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात हजारो लिटर दूध वाया गेले, तर टँकर चालक किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत सविस्तर असे की, आज सकाळी ११ च्या सुमारास दुधाने भरलेला टँकर (क्रमांक – एम एच १६ ए इ ४८६६) बारामती डायनामिक्स संकलन केंद्र वडगाव मधून गुनाट मार्गे गोलेगाव या ठिकाणी जात असताना गुनाट येथे वळणावर टँकर चे नियंत्रण सुटून अपघात झाला.
अपघात झाल्यानंतर टँकरचालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. याबाबत बोलताना टँकरमधील सुपरवायझर संतोष फरगडे यांनी सांगितले की, सदर अपघात हा वळणावर असलेल्या दाट झाडीमुळे झाला. समोर अचानक ३०ते ४० शेळ्या टँकर ड्रायव्हरला दिसल्या. त्यामुळे टँकर साईडपट्टीच्या पुलाजवळ घसरुन पलटी झाला.
घटनेनंतर टँकर ड्रायव्हरला काच फोडून बाहेर काढण्यात आले व रुग्णालयात नेण्यात आले. या अपघातामध्ये हजारो लिटर दुध वाया गेले. गुनाट येथील अपघाती वळणावर असलेल्या साईट पट्टीवरील दाट झुडपे आणि गतिरोधक नसल्यामुळे वाहतुकीचा वेग यामुळे शिरूर -गुनाट -निर्वी रस्त्यावर असे अपघात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. घटना टळण्यासाठी गुनाट ग्रामस्थांकडून बांधकाम विभागाला वळणावरील दाट झाडी काढणे आणि गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.