संपादकीय
महाराष्ट्रातील पीडब्ल्यूडीचा कारभार कसा सुरू आहे हे सामान्य माणसाला सांगण्याची गरज नाही. ठेकेदाराच्या कडेवर फिरणारे अभियंता आणि ठेकेदार सांगेल तसे मोजमाप हे आता समीकरण बनले आहे. हे सामान्यांना माहिती होते, रस्त्याच्या कामावरून टक्का घेणाऱ्या पत्रकारांना माहिती होते, ठेक्यातला कमिशनचा टक्का घेणाऱ्या ग्रामपंचायत मेंबरपासून ते मंत्र्यांपर्यंत माहिती होते.. मग त्या खात्याच्या मुख्य सचिवाला कसे बरे माहिती होत नसेल? शंका आली ना?
बरोबर आहे. आम्हालाही ती शंका आलीच होती. पण काल मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जयंतीच्या निमित्ताने या खात्याचे महाराष्ट्राचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक यांनीच ही खदखद व्यक्त केली आणि सोनाराने कान टोचले अशी भावना निर्माण झाली. कोणीतरी आहे की, ज्याला अगोदर स्वतःला या खात्याची लाज वाटतेय, म्हणून तो अभियंत्यांपर्यंत साऱ्यांनाच जरा लाज वाटू द्या असे सांगतोय.. धन्य वाटले..!
पीडब्ल्यूडी म्हणजे भ्रष्टाचार.. पीडब्ल्यूडी म्हणजे डर्टी गेम.. पीडब्ल्यूडी म्हणजे पैसे.. पीडब्ल्यूडी म्हणजे धूळ… पीडब्ल्यूडी म्हणजे फायलीवर फायली.. महाराष्ट्रातील जनतेची पीडब्ल्यूडीविषयीची ही मानसिकता.. अरे.. हो.. हो.. आम्ही म्हणत नाही हे..! याच खात्याचे सध्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांचेच हे मत आहे.. बरे झाले, त्या खात्याच्या मंत्र्यानेच आपले खाते नागडे केले.. पण मग आपले खाते निर्लज्ज आहे, तरीही हे दोघे ते खाते का घेत असतील बरे? असा प्रश्न मात्र कोणी करायचा नाही बरं का?
वाचकहो.. तुमच्या भागात रस्ता होताना तुम्ही पाहिला असालच.. म्हणजे या महाराष्ट्रातला प्रत्येक सुजाण नागरीक आपल्या भागात रस्ता होताना पाहतोच.. रस्ता मंजूर झाल्याचे अगोदर समजते.. मग भूमीपूजनाचा कार्यक्रम होतो. मग तेथील आमदार भलीमोठी भाषणे ठोकतो.. मग पुढे काय होते, कोणास ठाऊक? लगबगीने आणून टाकलेली खडी, उकरलेली साईडपट्टी पुढे सहा महिने, आठ महिने तशीच राहते..
मग अचानक मार्चचा महिना जवळ येतो.. मग पुन्हा काय ती लगबग.. काय तो पसारा.. रोलर, कटर, डंपर यांची पुन्हा भाऊगर्दी होते.. मग काम सुरू झाल्याचा बोर्ड लागतो.. म्हणजे भूमीपूजनाच्या वेळीच तो लागलेला असतो. मात्र त्यात थोडी तारखेचा बदल केला जातो. मग प्रत्यक्ष कामाला सुरवात झाल्याचे हा ठेकेदार गावभर बोंबलत सुटतो.. आता हे गणित कोणालाच माहिती नसते.. तो का बोंबलत असतो? तर लोकांनी या कामावरून प्रश्न उपस्थित करू नयेत.. मार्च एन्डींग असते ना! दहा टक्क्याच्या बिलांमध्ये कोणी आडवे पडू नये म्हणून..!
मग अशातच पावसाळा तोंडावर येतो आणि झोपलेला पीडब्ल्यूडीचा कुंभकर्ण जागा होतो. शाखेचा अभियंता प्रचंड वेगाने आपला आक्राळविक्राळ जबडा पसरतो.. आणि ठराविक टक्क्यांची मलई खाल्ली की ऐन पावसाळ्यात कामाला सुरवात होते.
कामेही अशी भन्नाट असतात की, त्या रस्त्याचा उपयोग करणाऱ्यांना कुठून झक मारली आणि या रस्त्याच्या कामाची मागणी केली असा पश्चाताप होतो. रस्त्याच्या कामाला सुरवात होते. कोठूनतरी मुरूम मिश्रीत खडी पैदा केलेली असते. तीच किती चांगली हे सांगणारे भाटही गोळा केलेले असतात. ज्या भागात काम करायचे, तेथील सडकसख्याहारी व स्वयंघोषित नेत्यांना हाताशी अगोदरच धरलेले असते. मग ते स्तुतीचे पोवाडे गात राहतात.
थोड्या दिवसांनीच वळवाचा पहिला पाऊस पडतो..आणि इथून सुरू होते, पीडब्ल्यूडीच्या कामाची वेशीवर टांगावी अशा मानसिकतेची सुरवात..! एका कोपऱ्यात हात घातला की, डांबराची लादी एखाद्या पावाच्या लादीसारखी हातात येते. अख्खाच्या अख्खा रस्ता उचकटून हातात येईल की काय अशी भीतीही वाटत राहते. त्यातच एखादा चोरलेल्या वाळूचा रात्रीच्या अंधारात खेळ चालवणारा हायवा डंपर त्या रस्त्यावरून गेला की, त्या रस्त्याला उंटाच्या पाठीचा फिल येतो.
जणू अनेक उंटांवरून आपण प्रवास करतोय अशी मजा येत राहते आणि थोड्या दिवसांनी आपण चंद्राच्या कला पाहत चंद्रावरील टेकाड्यांवरूनच प्रवास करतोय असा अनुभव घेत हेच फळ काय मम तपाला? असा प्रत्येकजण स्वतःला प्रश्न विचारत असतो.
मनोज सौनिक यांनी खदखद व्यक्त केली, अर्थात त्यातही त्यांनी अकलेचे तारे तोडलेच. म्हणजे आपण काम करतो, म्हणून रस्ते दिसतात. भले रस्त्यात खड्डे असतील, आपण किती खड्डे बुजवले हे कोणी सांगत नाही, मात्र खड्ड्यांचा हिशोब लगेच सांगितला जातो असे सौनिक बोलून गेले.
सौनिकसाहेब, तुम्ही आलिशान सरकारी वाहनातून फिरता. वातानुकुलीत कक्षात बसून कारभार पाहता. जरा वाड्यावस्त्यावर येऊन फिरा. एखादा रस्ता तयार होताना, अर्थात जो तुम्हाला आवर्जून दाखवला जातो, तो नव्हे, तर एखादा असा रस्ता, जो राजकीय नेत्यांच्या बगलबच्च्यांनी, जवळच्या, लाडाच्या ठेकेदारांनी बनवायला घेतलाय, त्याची खबऱ्या्ंकडून माहिती घेऊन तो रस्ता एकदा पहा ना..! तुम्हाला स्वतःचीच आणखी लाज वाटली नाही, तर आम्ही महाराष्ट्र सोडून जाऊ.. अर्थात तुम्हाला लाज वाटलीच पाहिजे. जर ती ते दृश्य पाहूनही वाटली नाही, तर मग त्याला आमच्याकडे दुसरे नावच नाही. कारण आमच्यातले कितीकजण अशा रस्त्यांवरून प्रवास करताना मणक्यांच्या आजाराचे शिकार झाले अन कितीएक डॉक्टर मजल्यावर मजले चढवत राहीले, कळलेच नाही.
चला, कधीकधी वावटळीतही दिवा लावावा लागतो. म्हणजे तो दिवा लागेल याची स्वप्नं पाहावीच लागतात. स्वतःच्या खात्यातील चुकीच्या गोष्टीवर मनोज सौनिक बोलले तरी, कितीएक सचिव आहेत की ते बोलतही नाहीत आणि खायचेही कमी करीत नाहीत. पीडब्ल्यूडी हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या आस्थेचे खाते आहे. ते आस्थेचेच राहावे हीच यानिमित्ताने अपेक्षा आहे.
अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नाला आपण वाचा फोडली याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.