बारामती महान्यूज लाईव्ह
निरा खोऱ्यातील सर्वच धरणे परतीच्या पावसाने भरल्याने आज सकाळी ३५ हजार क्युसेक्सवर असलेला विसर्ग जलसंपदा खात्याने वाढवून तो ४३ हजार क्युसेक्सवर नेला आहे. त्यामुळे आज दुपारनंतर काही पूल पाण्याखाली जाण्याची भिती जलसंपदा खात्याने व पूर नियंत्रण कक्षाने व्यक्त केली आहे. त्यामुळे निराकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
वीर धरणातून पावणेचार वाजता निरा नदीत ४३ हजार ७३३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यापूर्वा तो विसर्ग ३२ हजार ४५९ क्युसेक्स होता. भाटघर धरणातून ९ हजार ६०० क्युसेक्स, निरा देवघर धरणातून ५ हजार ६० क्युसेक्स गुंजवणी धरणातून १७८० क्युसेक्स व वीर धरणातून ३४ हजार ४५९ क्युसेक्स असा विसर्ग सोडण्यात आला आहे.
या पाण्यामुळे लोणंद, सासवड रस्त्यावरील वाहतूक बंद करण्याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान सर्व धरणे १०० टक्के पूर्ण भरली आहेत. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा असल्याने पुढील वर्ष चांगले जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.