इंदापूर – महान्यूज लाईव्ह
तालुक्यातील बावडा येथील काकडेवस्ती येथे चार दरोडेखोरांनी घरात शिरून पतीपत्नीला बेदम मारहाण करून सोन्याचे दागिने चोरले व पतीपत्नीला कोंडून पोबारा केला.
या दरोड्यात अनिता अंकुश काकडे व अंकुश काकडे यांच्या घरातील सव्वा लाखांचे दागिने दरोडेखोरांनी लुटले. आज (ता.१५) पहाटे दोनच्या सुमारास अनिता काकडे यांना अचानक जाग आली. त्यांना घराची खिडकी वाजल्याचा आवाज आला. त्याचवेळी दरवाजाला जोरात धक्का दिल्याने आतील कडी तुटली व दरवाजा उघडला.
त्याचवेळी चार अनोळखी दरोडेखोर घरात घुसले. त्यांनी अनिता काकडे यांना पाहिले. अनिता यांनी मदतीसाठी हाका मारण्याचा प्रयत्न करताच त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांचे मंगळसूत्र हिसकून घेतले व कपाटातील दागिने काढून घेतले. त्यानंतर अनिता यांच्या कानातील फुले व मुलीच्या कानातील सोन्याच्या रिंगा घेतल्या. तोपर्यंत अनिता यांचे पती अंकुश काकडे यांना बाहेरील दोघांनी बेदम मारहाण केली व दोघांना आतमध्ये कोंडून दरोडेखारांनी पळ काढला.
दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, इंदापूरचे पोलिस निरीक्षक टी.वाय. मुजावर. सहायक निरीक्षक नागनाथ पाटील, प्रकाश पवार आदींनी घटनास्थळी भेट दिली असून याप्रकरणी चार दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.