युवराज जाधव, सांगली
सांगली जिल्ह्यातील लवंगा गावात पोरं पकडून नेणारी टोळी आली या अफवेतून पंढरपूरकडे निघालेल्या साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी २५ जणांवर गुन्हे दाखल करून ७ जणांना अटक केली असून राज्याच्या गृहमंत्र्यांनी यातील आरोपींना कठोर शिक्षा सुनावण्याचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी साधूंनी तक्रार देण्यास नकार दिला. त्यांना परमेश्वर शिक्षा देईल असे सांगून साधू पुढील प्रवासाला निघून गेले. मात्र साधूंना मारहाण करताना त्यांना ओढून मारहाण करतानाचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. त्या आधारे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.
सुरवातीला ही घटना घडल्यानंतर हा प्रकरा गैरसमजूतीने झाल्याचे स्पष्ट झाले. या नंतर पोलिसांनी साधू व ग्रामस्थांकडून लेखी घेतले. मात्र पालघर प्रकरणात मोठी बोंबाबोंब करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आता भाजपचे सरकार असल्याने काहीच ओरड झाली नाही, अशी चर्चा सुरू झाल्यानंतर राज्याच्या गृहमंत्रालयाने यात लक्ष घातले आणि कठोर कारवाईचे निर्देश दिले.
त्यानंतर पोलिसांनी कारवाई अधिक कठोर केली. दरम्यान हे साधू चार होते. ते वाराणसीतून पंढरपूरमार्गे कर्नाटकमध्ये निघाले होते. मात्र ही मुले पळवणारी टोळी असल्याची अफवा परिसरात पसरल्याने काठी, लाकडांनी साधूंना मारहाण करण्यात आली. पोलिस तेथे पोचले नसते, तर पालघरची पुनरावृत्ती झाली असती.