दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरांनी गोठ्यातील दोन शेळ्या चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, रविवार (ता.११) रात्री १० च्या सुमारास पाटस – दौंड अष्टविनायक मार्गावरील पाटस हद्दीत गारफटा येथील शेतकरी अमोल होले यांच्या घरा समोरील गोठ्यात एक गाई व तीन शेळ्या होत्या. होले हे पहाटे उठले असता त्यांना दोन शेळ्या गोठ्यात दिसून आल्या नाहीत. त्यांनी आसपासच्या परिसरात शेळ्यांचा शोध घेतला मात्र त्या मिळून आल्या नाहीत.
रस्तालगतच घर आणि गोठा असल्याने अज्ञात चोरट्यांनी दोन शेळ्या दावे तोडून चोरून घेऊन गेल्याची संशय आला. या प्रकरणी होले यांनी फिर्याद दिल्याने यवत पोलीस ठाण्यात शेळ्या चोरी केल्याने अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार सागर चव्हाण करत आहेत.
दरम्यान, यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी व चारचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र आता पाळीव प्राणी चोरी होण्याच्या घटना ही घडु लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पाटस परिसरात शेतीबरोबरच कोंबड्या, मेंढरे, शेळ्या, गाई, म्हशी असे पाळीव पशुधन पालनाचा जोडव्यवसाय शेतकरी करत आहेत.
शेतकरी नैसर्गिक संकटाचा सामना करीत आहेत.त्यातच शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आता. त्यातच शेतातील पशुधानाची चोरी, विद्युत पंप, केबल चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.