पुणे – महान्यूज लाईव्ह
१९ वर्षीय दोन जिवलग मैत्रिणींनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याने पुणे हादरले. हडपसर जवळील शेवाळवाडी गावात मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. मंगळवारी सध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास आकांक्षा औदुंबर गायकवाड व सानिका हरिश्चंद्र भागवत या दोघींनी आत्महत्या केली.
या दोघींच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. हा प्रकार शेवाळवाडी गावच्या जिल्हा परीषद प्राथमिक शाळेजवळ असलेल्या अभिनंदन क्रिस्टल टॉवर या इमारतीत घडला.
मंगळवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास सानिका हिने राहत्या घऱात गळफास घेतल्याने सर्वत्र खळबळ उडाली. यानंतर स्थानिक नागरिकही तेथे जमा झाले व पोलिसांना कळवल्यानंतर काही वेळातच पोलिसही घटनास्थळी पोचले. सानिका हिचा मृतदेह खाली घेऊन तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून नेण्यात आला.
ही घटना तिची मैत्रिण आकांक्षा हिने पाहिली आणि तिने पाचव्या मजल्यावरून थेट उडी मारली. तिने मारलेली उडी नेमकी सानिका हिचा मृतदेह घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेनजिक पडला. थेट वरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या आकांक्षाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेने सारेच स्थानिक नागरिक हादरून गेले. कोणालाच काही समजत नव्हते. पोलिसांनी तातडीने या घटनेचीही दखल घेत तिला उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचाही या घटनेत मृत्यू झाला होता. पुढील तपास हडपसर पोलिस करीत आहेत.