बस मधील लेडीज बॅग मधील १८ तोळे सोन्याचे दागिने चोरणारा चोरटा जेरबंद! यवत पोलीसांनी मध्यप्रदेश मधुन केले अटक! केडगाव येथे घडली होती चोरीची घटना!
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील केडगाव येथे हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स बसमधून अज्ञात चोरांनी सोन्याच्या १८ तोळे दागिन्यांसह ११ लाखांचा ऐवज लंपास केला होता. यवत पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने शर्थीचा तपास करीत थेट मध्यप्रदेश येथील खेरवा येथून चोराला मुद्देमालासह अटक केली. एवढेच नाही, तर ९ लाख ३६ हजारांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात यश मिळवले.
ही माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. इस्माईल बाबू खान ( वय ३६ रा.धरमपुरी बायपास ता.मनावर जि.धार राज्य मध्यप्रदेश ) असे अटक केलेल्या आरोपाचे नाव आहे. केडगाव येथील हॉटेल समाधान समोर ३१ जुलै २०२२ रोजी अनुराधा आनंद चांडक ( रा. पुणे मुळ रा. उस्मानाबाद ) यांची श्री विश्व ट्रॅव्हल्स बस (नंबर एम एच २४ ए. बी.७५०० ) मधून लेडीज बॅग व त्यामधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, कागदपत्रे असा एकूण ११ लाख १३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याची तक्रार त्यांनी यवत पोलीसांकडे दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा यवत पोलीसांनी छडा लावला. पोलिसांनी हॉटेलचे सी.सी. टी.व्ही.फुटेज तपासले असता एका संशयित व्यक्तीविषयी माहिती घेण्यास सुरुवात केली. हा संशयित व्यक्ती हा धरमपुरी ता.मनावर जि. धार मध्यप्रदेश येथील असल्याची माहिती बऱ्याच सखोल तपासाअंती पोलिसांनी मिळवली.
मग यवत गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, पोलीस नाईक अक्षय यादव, दामोदर होळकर, वसीमोद्दीन शेख, पोलीस मित्र निलेश चव्हाण आदींनी मध्यप्रदेश गाठले. तेथे सलग ७ दिवस थांबून सापळा रचला. त्यांनी खलघाट, धरमपुरी, मनावर, उमरबन, खेरवा मध्यप्रदेश या भागात या संशयित व्यक्तीचा शोध घेतला आणि अखेर खेरवा ता.मनावर जि. धार येथुन मनावर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश अलवा व यवत पोलीस स्टेशन पथकाने या व्यक्तीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून गुन्हयातील चोरीस गेलेले १८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने एकूण किंमत ९ लाख ३६ हजारांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी या आरोपीला दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.