इंदापूर महान्यूज लाईव्ह
आज कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमात सांगोल्याचे काय झाडी, काय डोंगार फेम आमदार शहाजीबापू पाटील यांनी अशी फटकेबाजी केली, इंदापूरकर हसून हसून बेजार झाले. अगदी लहानपणापासूनच्या आठवणी काढून त्यांनी साऱ्यांनाच खळखळून हसवले.
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यावेळी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर इंदापूर तालुक्यासह आसपासच्या भागातील मान्यवर उपस्थित होते. शहाजी पाटील यांनी चिंतनाचा मुद्दा पुढे काढला. चिंतनाच्या मुद्द्यावर आल्यानंतर त्यांनी बायकोशी कसा वाद होतो हे सांगितले. ते म्हणाले, मला नेहमी अद्भूत असे वाटते. चिंतन ही माझी फार आवडीची सवय आहे.
माझं आणि माझ्या पत्नीचं भांडण याचं मुद्द्यावरुन होतं असतं. मी घराच्या बाहेर वडाच्या झाडाखाली खुर्चीवर बसलो की,ती म्हणते उगाचचं येड्यावाणी बसलायं, या की आत ! आता साखरेमहाराज घोटाळा असा हाय की, चिंतन ही काय विषय काम करून दाखवायची वस्तू नायं. म्हणजे काय चिखल कालवायचा नाही.
आता चिंतन करीत बसलो की, पण चिंतनातून मला असं वाटतं की, काय आपल्या जीवनात असंल. लहानपणापासूनचं मला महान व्यक्तींचा सहवास लाभत गेला.आणि या सहवासातचं ज्या महान व्यक्तीचा, सत्पुरुषांचा, साधूचा मला पहिला सहवास लाभला यामागचं गणित काय असावं याचं चिंतन करत असतो.
सगळ्यात म्हणजे ज्या महान व्यक्तीचा मला अगदी तिसरी, चौथीपासून सहवास मला लाभला ते म्हणजे कर्मयोगी शंकररावजी पाटील. मी अतिशय तल्लखबुध्दीचा लहानपणापासूनच होतो असं म्हणून सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.