सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : शंभर वर्षापेक्षा जास्त जुना असलेल्या निरा डावा कालव्याचे बरेच ठिकाणी गळती व पाझर होत आहे.अशा गळतींमुळे कॅनॉल वरील सर्व शेतकयांचे समान न्यायाने पाणी वाटप होत नसल्याचा आरोप करत निरा डावा कालव्याचे १०० टक्के अस्तरीकरण करण्यात यावे, अशी मागणी निमसाखरचे शेतकरी रवी पवार यांनी केली.
बारामती – इंदापूर या मार्गावरील ५४ फाटा येथे नीरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण करावे या मागणीसाठी सोमवार (दि.१२ ) सकाळी ११ वाजता रास्ता रोको करण्यात आला.यावेळी आंदोलनातील एकमेव भाषण झालेले शेतकरी रवी पवार यांनी अस्तरीकरणाची का गरज आहे याची माहिती मांडली.
रवी पवार पुढे बोलताना म्हणाले कि, जलसंपदा खात्याकडुन दोन आवर्तनातील कालावधी दिवसेंदिवस वाढत जात असून त्यामुळे बरेच भागातील पिके जळून जात आहेत.याचा परिणाम तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावातील पिण्याचे पाणी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होतनाचे दर वर्षी हाल होतात.
दरम्यान निमसाखर येथील भजनी मंडळाकडून टाळ मृदंगासह विठ्ठलाचा जय घोष करीत रस्त्यावर भजन करण्यात आले.यावेळी रामचंद्र महानवर यांनी ‘आंदोलनाला पाठिंबा’ असे बैलांच्या अंगावर लिहुन उपस्थिती दर्शवली. यावेळी आंदोलनकर्त्यांचे निवेदन येथील भजनी मंडळाच्या हस्ते बारामतीचे उपअभियंता अश्विन पवार यांनी स्वीकारले.
यावेळी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातूरे , मंडल अधिकारी शहाजी राखुंडे, शाखा अभियंता आर.डी. झगडे , लालासाहेब पवार , अभिजीत रणवरे , नंदकुमार रणवरे,विरसिंह रणसिंग ,विनोद रणसिंग,जयकुमार कारंडे ,ॲड.नितीन कदम , बाबुराव रणवरे, सुदर्शन रणवरे ,सुनिल कारंडे ,लालासाहेब चव्हाण, नवनाथ रणवरे, हर्षल रणवरे, दत्तात्रय पोळ , गुलाबराव पोळ ,सुहास गुरव ,राजेंद्र घोरपडे , बाळासाहेब मुलाणी यांच्यासह निरवांगी , निमसाखर , घोरपडवाडी सह अन्य गावातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बारामती येथील जलसंपदा विभागाचे उप अभियंता अश्विन पवार म्हणाले की , नीरा डाव्या कालव्यावर हे जे अस्तरीकरण पूर्ण लांबी केले जाणार नसुन ते टप्प्याटप्प्याने होणार आहे. कॅनॉलचे अस्तरीकरण हे जास्त पाझर असलेल्या भागात केले जाणार असुन दहा सेंटिमीटर जाडीचे अस्तरीकरण असून स्ट्रक्चर जिथे आहे तिथे स्टीलचा वापर केला जाणार आहे. या अस्तरीकरणामुळे पाण्याची मोठी बचत होणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.
आंदोलनाला ग्रामपंचायतींचा पाठिंबा.
आंदोलनावेळी निरवांगी , घोरपडवाडी , निमसाखर सह अन्य ग्रामपंचायतींनी नीरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण व्हावे यासाठी होत असलेल्या आंदोलनासाठी पाठिंबाचे पत्र यावेळी दिले.