भिगवण महान्यूज लाईव्ह
भिगवण येथील एकाने खासगी सावकाराचे घेतलेले कर्ज महिना १० टक्के व्याजदराने परत करूनही नोटरी केलेल्या जमीनीच्या दस्ताच्या आधारे जमीन घेण्यासाठी दमदाटी करणाऱ्या सावकाराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भिगवण पोलिसांनी याप्रकरणी अभिजीत सुदाम पानसरे या खासगी सावकारावर गुन्हा दाखल केला आहे. भिगवणमधील संजय भाऊसाहेब गिरमकर यांनी यासंदर्भात पोलिसांना फिर्याद दिली होती.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गिरमकर यांनी जून ते ऑगस्ट २०२२ दरम्यान १ लाख रुपये प्रतिमहिना १० टक्के व्याजदराने अडचण असल्याने खासगी सावकार पानसरे याच्याकडून घेतले होते. दरम्यान हे लाख रुपये देताना पानसरे याने गिरमकर यांच्याकडून गिरमकर यांची भादलवाडी येथील एक एकर जमीनीची विसारपावती करून घेतली होती.
गिरमकर यांनी पानसरे याच्याकडून घेतलेल्या १ लाख रुपयांसह १० हजार रुपये व्याजाचे दिले व जमीनीची नोटरी केलेला दस्त माघारी मागितला असता पानसरे याने गिरमकर यांना तुझी जमीन मीच घेणार, तुला परत देणार नाही असे म्हणत गिरमकर व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ व दमदाटी केली.
त्यावरून गिरमकर यांनी भिगवण पोलिसांकडे दाद मागितली. पोलिसांनी पानसरे याच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गिन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास सहायक निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रुपेश कदम करीत आहेत.