बारामती – महान्यूज लाईव्ह
सध्या कोरोनाच्या काळापासून हेल्थ मेडिक्लेमविषयी जागरुकता वाढू लागली आहे. मात्र या विम्याच्या दुनियेत बॅंकांचे अधिकारीही कमिशनपोटी उतरले आहेत. बॅंकादेखील कर्ज देण्याच्या बदल्यात कंपन्या, कंपन्या्ंचे संचालक, खातेदार, कर्जदारांना त्यांच्या बॅंकेकडून विमा पॉलिसी घेण्याचा आग्रह करू लागल्या आहेत. मात्र या बॅंका या विमाधारकांविषयी विश्वासार्ह राहत नसल्याची उदाहरणे आता समोर येऊ लागली आहेत. भवानीनगर येथील महाराष्ट्र बॅंकेतही खातेदाराला असाच अनुभव आला आहे.
भवानीनगर येथील महाराष्ट्र बॅंकेकडून अमोल राजेंद्र भोईटे यांना आलेला अनुभव अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारा असाच आहे. विशेष म्हणजे अमोल भोईटे हे इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक असून त्यांच्या पत्नी या सणसर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच देखील आहेत. त्यामुळे प्रतिष्ठित खातेदाराबाबत आलेल्या अनुभवाने सामान्य खातेदारांसाठी तर मोठा धडाच आहे.
अमोल भोईटे यांनी महान्यूज शी बोलताना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भोईटे यांनी तीन लाख रुपये विमा रक्कम असलेली कुटुंबाची पॉलिसी ३४ हजार रुपयांना विकत घेतली. ८ जुलै २०२१ ते ७ जुलै २०२२ पर्यंत ही पॉलिसीची मुदत होती. मात्र अमोल भोईटे यांच्या वडीलांना हृदयाशी संबंधित विकारासाठी नेमके २९ जून रोजी तातडीच्या उपचारासाठी बारामतीतील खासगी दवाखान्यात दाखल करावे लागले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. ते दवाखान्यातच असतानाच ७ जुलै रोजी त्यांची पॉलिसीची मुदत संपणार होती. आपली पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वीच ती पुन्हा सुरू झाली पाहिजे यासाठी ७ जुलै रोजी त्यांनी महाराष्ट्र बॅंकेचे कार्यालय गाठले.
मात्र आज रात्रीपर्यंत या पॉलिसीची मुदत असल्याने ७ जुलै रोजीच ही पॉलिसी नुतनीकरण करता येणार नाही असा नवीनच फंडा बॅंकेतील एका महिला कर्मचाऱ्याने सांगितल्याचे भोईटे यांचे म्हणणे आहे. त्यानंतर बॅंकेमध्ये ८ जुलै रोजी भोईटे यांनी ही रक्कम भरली. मात्र प्रत्यक्षात बॅंकेने ही रक्कम युनायटेड इंडिया इन्शुरन्स या कंपनीकडे ११ जुलै रोजी भरली अशी माहिती इन्शुरन्स कंपनीकडून देण्यात आली. पॉलिसीची रक्कम उशीरा भरल्याची बॅंकेची चूक भोईटे यांना चक्क लाखाला पडली.
भोईटे यांनी दवाखान्यातून डिस्चार्ज घेतल्यानंतर विमा कंपनीला खर्चाची कागदपत्रे रिअॅम्बर्समेंट करीता पाठवली. मात्र विमा कंपनीने त्यांना वडीलांच्या उपचारातील त्यांची पॉलिसी सुरू असतानाच्या काळातील म्हणजे २९ जुलै ते ७ जुलै २०२२ पर्यंतची खर्चाची रक्कम दिली. मात्र त्यानंतरच्या काळात आमचा विमा लागू नसल्याचे या इन्शुरन्स कंपनीने स्पष्टपणे कळवले. त्यामुळे १ लाख रुपये केवळ महाराष्ट्र बॅंकेच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे खिशातून भरावे लागले. त्यामुळे महाराष्ट्र बॅंकेने चूक केली आणि ती चूक भोगण्याची वेळ मात्र माझ्यावर आल्याचे भोईटे म्हणाले.
बॅंकेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार..
महाराष्ट्र बॅंकेच्या सणसर शाखेत गुन्हेगार काम करत होते. महिला खातेदाराचे पैसे चोरले. आता विम्याचे कमिशन खायच्या हव्यासापोटी खातेदाराच्या माथ्यावर आग्रहाने विमा मारून त्यातही टंगळमंगळ करणारे कर्मचारी काम करीत असल्याने भोईटे यांनी बॅंकेने आता आपला झालेला खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.
दुसरीकडे यासंदर्भात महाराष्ट्र बॅंकेने आपली चूक झाल्याचे मेलही भोईटे यांच्या कुटुंबियांना पाठवले आहेत. त्यामुळे एक लाख रुपयांचा खर्च आपल्याला मिळाला नाही, तर बॅंकेच्या शाखेतील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे भोईटे यांनी सांगितले.
बॅंकेला वडीलांना अॅडमिट केल्याचे माहिती होते, तसेच बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना तशी कल्पनाही दिली होती. मात्र केवळ विमा लांबविण्यासाठी व टिपीए बदलण्यासाठी जाणीवपूर्वक हा सारा प्रकार करण्यात आला व पैसे मुद्दाम उशीरा पाठविण्यात आल्याचा आरोप भोईटे यांनी केला आहे. बॅंकेला दुसऱ्या दिवसापासून सुट्टी आहे, हे माहिती असतानाही पैसे भरले गेले नाहीत, त्यामुळे हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे भोईटे यांचे म्हणणे आहे.
एजंटपेक्षा विश्वासार्ह म्हणून बॅंकेला पसंती देत असाल तर सावधान..!
अलिकडच्या काळात बॅंकांनी विम्याची दुकानदारी सुरू केली आहे. गावातील एजंटाला परिस्थिती माहिती असते, मात्र केवळ बॅंकांचा प्रेमळ दबाव कर्जदार घेतात व विमा पॉलिसी खरेदी करतात. वास्तविक पाहता यात बॅंकांना मोठे कमिशन मिळते. हा बॅंकेचा धंदाच आहे. या उलट एजंट हे वाजवी दरात ग्राहकाला विम्याची पॉलिसी देतात. दुसरी गोष्ट म्हणजे कर्ज घेतले, म्हणजे बॅंकेकडून विमा पॉलिसी घेतलीच पाहिजे असे काही नाही. मात्र काही बॅंका या खातेदारांना वेळप्रसंगी भिती दाखवून अथवा कर्जाचा उपकार दाखवून गरज नसताना मोठी पॉलिसी माथी मारतात हा अनुभव आता नित्याचा बनू लागला आहे. भोईटे यांना आलेला अनुभव अनेक खातेदारांना इतरही बॅंकांकडून येत असल्याच्या चर्चा सातत्याने घडत आहेत. त्यामुळे गावातील एजंटवर विश्वास न ठेवता बॅंकांकडून विमा घेणाऱ्या खातेदारांनी नव्याने फेरविचार करण्याची वेळ आली आहे.