इंदापूर महान्यूज लाईव्ह
इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष व कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष गोकुळशेठ शहा यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले. माजी खासदार शंकरराव पाटील यांच्यानंतर इंदापूरच्या राजकारणातील सामाजिक जाज्वल इतिहासाचे एक पर्व संपले.
आज सकाळी गोकुळभाई शहा यांचे निधन झाले. आज संध्याकाळी चार वाजता इंदापूर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. इंदापूरचा औद्योगिक, व्यापारीक, राजकीय, सामाजिक इतिहास गोकुळभाईंच्या भोवती फिरत राहीला. शंकरराव भाऊंचे निकटचे सहकारी असा त्यांचा नावलौकिक होताच, मात्र त्यांचे इंदापूर नगरीतील वास्तव्य हे इंदापूरकरांसाठी मोठा आधार होते. सामाजिक अभिसरणाच्या काळात त्यांनी घेतलेला पुढाकार व इंदापूरातील वातावरण सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी एकूणच शहा कुुटंबियांचा असलेला सहभाग हा गोकुळभाईंच्या विचाराचा एक वारसा होता.
गोकुळदास भाई शहा यांचे जीवन खडतर आणि संघर्षातून गेले! लहानपणीच त्यांची आई वडील वारले व त्यांचा सांभाळ त्यांचे चुलते श्री. नारायणदास रामदास शेठजी यांनी केला. शिक्षण, व्यवसाय आणि सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यसैनिक, संस्थापक अध्यक्ष, नारायणदास रामदास शहा शेठजी यांनी सन १९३८ साली स्थापन केलेल्या इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे १९७० साली गोकुळदास भाई शहा अध्यक्ष झाले. अनेक प्रश्न व अडथळे सोडवून ते कार्यरत राहिले. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये विस्तार केला.
त्यांनी व श्री नारायणदास रामदास शेठजी यांनी मिळून, पुढे पुन्हा १९७२ साली ९ एकर जमीन उच्चशिक्षण स्थापन करण्यासाठी दान दिली आणि ती आज आय कॉलेज म्हणून ओळखले जाते. स्वतः गोकुळदास भाई शहा हे उच्चशिक्षण पासून वंचित राहिले पण ते इतरांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी त्यांची तळमळ होती. आणि म्हणून ही उच्च शिक्षणाची कल्पना अमलात आणली. आज इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले व अनेक लोकांना त्यापासून रोजगार मिळाला. आजही अनेक विद्यार्थी या संस्थेमार्फत शिक्षण घेत आहेत. त्याचा लाभ अनेक युवकांना व लोकांना मिळत आहे. अनेक जण पुढे इंजिनियर, डॉक्टर व इतर उच्चपदी आप आपल्या जिद्दीने होऊ शकले.
या संस्थांमध्ये सुरुवातीपासून आजपर्यंत असणाऱ्या सर्व प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांचे, शिक्षकांचे आभार. आपले काम मोलाचे आहे. इंदापूर सहकारी साखर कारखाना मध्ये गोकुळदास भाई शहा यांचे मोलाचे योगदान आहे. इंदापूर सहकारी साखर कारखाना हा १९८४ साली स्थापन झाला. स्थापन होण्यापासून व त्याची घडी नीट बसेपर्यंत त्यांनी व्हाईस चेअरमन पदाची धुरा सांभाळली व या पदी २२ वर्ष कार्यरत होते. शंकराव भाऊ पाटील व गोकुळदास भाई शहा व त्यांच्या सहकारी मित्रांनी ही संस्था अत्यंत काटकसरीने उभा केली व पुढे चालवली. ऊस उत्पादक शेतकरी हा आपला उस देत नव्हता त्यानंतर गोकुळदास भाई शहा शेठजी व सगळे सहकारी मित्र हे कारखान्यासाठी गावोगावी फिरले.
या सहकारी साखर संस्थेमार्फत अनेक लोकांना रोजगार मिळाला, अनेक लोकांच्या उसाच्या शेतीला भाव मिळाला. शेतीवर अवलंबून असणाऱ्या अनेक धंद्यांना पुढे वाव मिळाला. आपल्या अनेक त्यागाने व कष्टाने उभारलेल्या या संस्था लाखो लोकांना जीवनाचा आधार व आजही अनेक संधी देत आहे. गोकुळदास भाई शहा वेगवेगळ्या समाज कार्य ते करीत राहिले, स्वतःचे कापड व्यवसाय व घर उत्तम प्रकारे चालवले. बंधू सुरेशदास भाई शहा यांची साथ त्यांना मिळाली. पुढे त्यांची मुलं, मुकुंद शहा व भरत शहा यांनी समाज कार्य पुढे चालू ठेवले आहे. त्यांचे सुन सौ. अंकिता मुकुंद शहा व सौ. वैशाली भरत शहा यांनीदेखील समाजकार्य चालू ठेवले आहे. गोकुळदास भाई शहा साधी राहणे पसंत करत. उच्च विचार व साधी राहणे व काम करत राहणे त्यांचे धोरण. त्यांनी आपले आयुष्य व्यवसाय, कारखाना व शिक्षण मंडळ यात खर्च केला.