बारामती महान्यूज लाईव्ह
बारामती तालुका पोलिसांनी सामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्वाची कामगिरी करताना दोन सोनसाखळ्या भरदिवसा चोरणाऱ्या दोघांना जेरबंद केले. अर्थात हे जेरबंद होण्याची घटनाही तशी रंजकच घडली.
बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सूर्यनगरी व संदीप कॉर्नर रुई या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या हिसकावून चोरून नेल्याचे गुन्हे दाखल होते. त्यासंदर्भात तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी गुन्हे शोध पथकास सूचना दिल्या होत्या. त्यावरून गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार राम कानगुडे, पोलिस नाईक अमोल नरूटे, दत्तात्रय मदने, शशिकांत दळवी, दिपक दराडे यांनी शोध घेण्यास सुरवात केली होती. संशयितांची दुचाकी पोलिसांनी शोधण्यास सुरवात केली होती.
दरम्यान २२ ऑगस्ट रोजी हे पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना हेच संशयित चोरटे हे दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील सोने हिसकावून पळून जात होते. सूर्यनगरी भागातून वेगाने दुचाकीवर निघाले होते. समोर पोलिस दिसताच त्यांनी घाबरून दुचाकीचा वेग वाढवला आणि अचानक दुचाकी घसरली.
दुचाकीवरून पडलेल्या दोघांपैकी एकजण जखमी झाला. त्यास पोलिसांनी लागलीच दवाखान्यात उपचारासाठी नेले. मात्र तोपर्यंत त्याचा दुसरा साथीदार हा त्याला मदत न करता तशीच दुचाकी उचलून फऱार झाला. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी या जखमी युवकाकडे चौकशी करून दुसऱ्यालाही ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान मयूर राजेंद्र गटकुळ व राहुल अशोक चव्हाण (दोघे रा. शिरसोडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे) या दोघांनी चोरी केल्याचे व पोलिस दिसल्याने पळून जाण्यासाठी दुचाकी वेगात चालवल्याची कबुली दिली.
यातील मयूर राजेंद्र गटकुळ हा आरोपी सध्या बारामती तालुका पोलीस ठाण्यात पोलिस कोठडीत असून राहुल अशोक चव्हाण हा अपघातामध्ये जखमी झाल्याने सध्या त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दोन्ही चोरट्यांनी बारामती येथील सूर्यनगरी व संदीप कॉर्नर या ठिकाणावरून महिलांच्या गळ्यातील सोने हिसकावून जबरी चोरीचे गुन्हे केले आहेत. दोन्ही गुन्हयातील मिळून १ लाख ७५ हजार रुपयांचे सोने या दोघांनी चोरून नेले होते. ते मयूर गटकूळ याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. या दोन्ही गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे व सहाय्यक फौजदार श्री कोलते हे करीत आहेत.
दरम्यान या चोरट्यांनी आणखी गुन्हे केले असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. त्यामुळे आणख बारकाईने बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक तपास करीत आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, हवालदार राम कानगुडे, पोलिस नाईक अमोल नरूटे, दत्तात्रय मदने, शशिकांत दळवी, दिपक दराडे यांनी केली.